www.24taas.com, नवी दिल्ली
कोळसाखाण घोटाळ्यावरुन झालेल्या गदारोळामुळं संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज ३० तारखेपर्यंत तहकूब करण्यात आलंय. मंगळवारी कामकाज सुरू होताच भाजपच्या सदस्यांनी दोन्ही सभागृहात जोरदार गदारोळ घातला. त्यामुळं पहिल्यांदा दुपारी १२ वाजेपर्यंत आणि त्यानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. दोन वाजताही गोंधळामुळं कामकाज होऊ शकलं नाही. त्यामुळं दोन्ही सभागृह परवापर्यंत तहकूब करण्यात आली. सलग सहा दिवस संसदेचं कामकाज कोळसाखाण घोटाळ्यावरुन ठप्प आहे.
दरम्यान, भाजप सदस्यांनी आजही पंतप्रधांनांच्या राजीनाम्याची मागणी कायम ठेवलीय. आता भाजप कोळसा घोटाळ्यावरुन संसदेबाहेरही आंदोलन करणार आहे. देशातल्या प्रमुख शहरांमध्ये रॅली काढून आणि पत्रकार परिषद घेऊन घोटाळ्याची माहिती दिली जाणार आहे. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी भाजपनं आता तत्कालीन अन्न प्रक्रिया मंत्री सुबोधकांत सहाय यांच्यावरही टीका केलीय. छत्तिसगडमधल्या दोन कंपन्यांसाठी सहाय यांनी पंतप्रधान यांच्यासाठी शिफारस केली होती, असा आरोप भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी केलाय. पंतप्रधान कोळसा खाण वाटपात आपला काहीच संबध नसल्याचं सांगत आहेत मग सुबोधकांत सहाय यांनी मागणी केलेल्या कंपन्यांना दुसऱ्याच दिवशी कसे काय खाणी मिळाल्या असा सवाल भाजपनं केलाय.
...अन् सोनियांनी घेतला पुन्हा आक्रमक पवित्रा
कोळसाकांडावरुन सरकारवर होत असलेल्या हल्ल्यामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आक्रमक झाल्या आहेत. भाजपला जशास तसे उत्तर द्या, असा आदेशच त्यांनी काँग्रेस खासदारांना दिलाय. संसदेच्या कामकाजापूर्वी काँग्रेसच्या संसदीय दलाची बैठक पार पडली या बैठकीत सोनियांनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेण्याचे संकेत दिले. भाजपच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं जाईल असंही सोनियांनी सांगितलं. इराणच्या दौऱ्यावर पंतप्रधान रवाना झाले असताना संसदेत काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेण्याची रणनितीचा अवलंब केला गेलाय. आज संसदेतही हेच पहायला मिळालं. संसदेत भाजप खासदारांचा गोंधळ सुरु असताना सोनियांनी अंबिका सोनी यांना खूण करताच, सोनीही आक्रमक झाल्याचं आज लोकसभेत पहायला मिळालं. यापूर्वीही आसामच्या प्रश्नावर चर्चेवेळी लालकृष्ण अडवाणींच्या एका शब्दावर आक्षेप घेत, सोनियांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर अडवाणींना दिलगिरी व्यक्त करावी लागली होती. सोनियांचा तोच आक्रमक पवित्रा आजही संसदेत पहायला मिळला.