भाजपचा सत्तेचा मंत्र, जोडणार आता नवे मित्र

2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला आपली सत्ता यायला हवी असेल, तर त्यांना आहे ते सहकारी पक्ष टिकवण्यासोबतच नवे मित्र जोडावेही लागणार आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 23, 2013, 09:24 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला आपली सत्ता यायला हवी असेल, तर त्यांना आहे ते सहकारी पक्ष टिकवण्यासोबतच नवे मित्र जोडावेही लागणार आहेत. आपापल्या राज्यांमध्ये प्रबळ असलेल्या पण पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना परत फिरवण्याचं आव्हानही मोदींसमोर आहे.
सध्याच्या यूपीए सरकारमध्ये काँग्रेसचे 206 खासदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय लोकदल, नॅशनल कॉन्फरन्स, मुस्लिम लीग आणि केरळ काँग्रेस यासह यूपीएचं संख्याबळ 226 आहे. या सरकारला सपा, बसपा आणि राष्ट्रीय जनता दलाचा बाहेरून पाठिंबा आहे.

काठावर पास असलेल्या या सरकारशी टक्कर देऊन भाजप पुढल्या वर्षी आपली सत्ता येण्याची स्वप्न बघत आहे. मात्र मोदींच्या करिष्म्यानं स्वबळावर भाजपची सत्ता येईल, अशी शक्यता कमीच आहे. त्यामुळे महत्त्वाच्या राज्यांमध्ये नवे मित्र जोडण्याचं आव्हान मोदींपुढे आहे.
१९९९च्या निवडणुकीनंतर अस्तित्वात आलेली NDA आता नावालाच राहिली आहे. केवळ शिवसेना आणि शिरोमणी अकाली दल हे दोन जुने मित्रच त्यांच्यासोबत आहेत. हे मित्र टिकवणं भाजपला फारसं अवघड जाणार नाही. मात्र नवे मित्र जोडणं हे भाजपसमोर खरं आव्हान असेल.
42 लोकसभा सिट असलेल्या आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांना आपल्याकडे वळवण्याच्या प्रयत्नात भाजप आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि एआयएडीएमकेच्या सर्वेसर्वा जे. जयललिताही भाजपच्या जवळ आल्याचं दिसतंय. 1999 साली NDAचा भाग असलेल्या इंडियन नॅशनल लोकदलाचे नेते ओमप्रकाश चौताला यांना पुन्हा जवळ आणण्याचा प्रयत्न भाजपमधला एक गट करतोय. भाजपचे आणखी एका आघाडीवर प्रयत्न सुरू आहेत.
पक्ष सोडून गेलेले कर्नाटकातले वजनदार नेते बी.एस. येडियुरप्पा यांना परत आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसंच 2006मध्ये भाजप सोडून गेलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनाही पुन्हा पक्षात आणण्याचा प्रयत्न पक्षनेतृत्वाला करावा लागेल.
यापैकी महत्त्वाच्या आंध्र प्रदेशात चंद्राबाबूंना पुन्हा एकदा NDAच्या जवळ आणण्याचे प्रयत्न भाजपनं सुरू केलेत. भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह आणि चंद्राबाबूंची नुकतीच भेट झाली. जगनमोहन रेड्डी यांनी काँग्रेसशी बंडखोरी केलीये. अशा स्थितीत टीडीपी-भाजप जवळ आल्यास काँग्रेसच्या फुटलेल्या मतांचा निदान कोस्टल आंध्रमध्ये चांगला फायदा होऊ शकतो.
1999 साली भाजपचे 182 खासदार निवडून आले होते. तर सध्याच्या लोकसभेत सध्याचे 116 खासदार आहेत. ही संख्या किमान 100 नी वाढवण्याचं आव्हान भाजपसमोर आहे. 210 ते 220 भाजप खासदार, जुने-नवे मित्र, दुरावलेले स्वपक्षीय यांची मोट भाजपला बांधावी लागेल... तरच महागाई, भ्रष्टाचारानं जनतेला जेरीस आणणा-या यूपीए सरकारला समर्थ पर्याय भाजप देऊ शकेल...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.