बंगळुरू : भाजपची दोन दिवसांची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक, बंगळुरुमध्ये सुरु झालीय. केंद्रात भाजपचं सरकार आल्यानंतर ही पहिलीच कार्यकारिणी बैठक आहे. या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह कालच बंगळुरुत दाखल झालेत.
पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या संबोधनानं राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात झाली. आम्ही केंद्रात १० महिने भ्रष्टाचार मुक्त सरकार दिलं असल्याचं यावेळी शाह यांनी आपल्या भाषणात म्हटलंय. सोबतच, अर्थव्यवस्था मजबूत झाल्याचाही दावा त्यांनी केलाय. तसंच, मोदी सरकारच पुढची २० वर्ष सत्तेत राहील, असा विश्वास प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलाय.
दोन दिवसांच्या या बैठकीत दोन महत्त्वाचे ठराव मांडले जाणार आहेत. लोकसभेत निर्विवाद बहुमत असतानाही, भूसंपादन विधेयकावरुन राज्यसभेत भाजपची पुरती कोंडी झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी रणनीती ठरवण्याकरता, या बैठकीत विचारमंथन होणार असल्याची माहिती मिळतेय.
विशेष म्हणजे यंदाच्या बैठकीत जुन्या पायंड्यांना फाटा देण्यात आला आहे. गेलं दशकभर भाजपच्या प्रत्येक राष्ट्रीय कार्यकारिणीची सांगता, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या मार्गदर्शनपर भाषणानंच व्हायची.
यंदा मात्र कार्यक्रम पत्रिकेत वक्ता म्हणून अडवाणी यांचं नावच नाही. तर कार्यकारिणीचा अजेंडा ठरवण्यासाठी काल झालेल्या बैठकीत, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभागी होऊन नवा प्रघात घालून दिल्याचं बोललं जातंय.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर काँग्रेसची जोरदार निदर्शनं सुरू आहेत. काळा पैसा परत आणण्याचं आश्वासन भाजप सरकारनं पाळावं अशी मागणी करत काँग्रेसनं हे आंदोलन केलं. कार्यकर्त्यांनी यावेळी १५ लाखांच्या चेकची प्रतिकृती झळकावली. आधीच पंतप्रधान मोदींसह केंद्रातले अनेक मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते शहरात असताना सुरक्षा यंत्रणांवर ताण आहे. काँग्रेसच्या या निदर्शनांमुळे त्यात भरच पडलीय. अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.