नवी दिल्ली : भारताला मूळापासून हादरवून टाकणाऱ्या भूकंपाची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञांनी ही माहिती दिलीय.
'टाईम्स ऑफ इंडिया'नं दिलेल्या माहितीनुसार, ८.२ रिश्टर स्केलहून अधिक तीव्रतेचा भूकंप हिमालय क्षेत्रात होण्याची शक्यता आहे.
सोमवारी मणिपूरला हादरवून टाकणाऱ्या भूकंपाहून हा येणारा भूकंप मोठा असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. मणिपूरमध्ये ६.७ (जानेवारी २०१६), नेपाळमध्ये ७.३ (मे २०१५) आणि सिक्कीममध्ये २०११ साली आलेल्या ६.९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे या भागातील भूगर्भीय स्थिती हादरून गेलीय. अगोदरच्या झटक्यांमुळे जमिनीच्या खाली मोठ्या भेगा पडल्यात.
नेपाळमध्ये आलेल्या भूकंपानंतर ही चेतावणी आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञांनी दिलीय. पूर्वेत्तर क्षेत्र विशेषत: डोंगराळ भागात भूकंपाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढलाय. याशिवाय, बिहार, उत्तर प्रदेश आणि राजधानी दिल्लीलाही धोक्याचा इशारा देण्यात आलाय.
उल्लेखनीय म्हणजे, दिल्ली हा संवेदनशील मानल्या जाणाऱ्या झोन ४ चा भाग आहे. तर पूर्वेत्तर राज्य आणि डोंगराळ भाग झोन ५ म्हणजेच भूकंपाच्या दृष्टीनं सर्वात जास्त संवेनशील मानल्या जाणाऱ्या झोनमध्ये येतात.