नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीची घोषणा केल्यानंतर डिजीटल पेमेंटला चालना देण्यासाठी बँकांनी व्यवहारांवर दर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि अॅक्सिस बँकेनं या नव्या शुल्कांसाठीची नियमावली जाहिर केली आहे.
- महिन्याला चार व्यवहार केल्यानंतर एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना पुढच्या प्रत्येक व्यवहारासाठी प्रत्येकी १५० रुपये शुल्क द्यावं लागणार आहे.
- ग्राहकांनी ज्या एचडीएफसी बँकेत खातं उघडलं तिथून महिन्याला २ लाख रुपये काढता येतील. २ लाखांच्या वर ग्राहकाला प्रत्येक एक हजार रुपयासाठी ५ रुपये द्यावे लागतील.
- ग्राहक एचडीएफसीच्या दुसऱ्या शाखेतून दिवसाला २५ हजार रुपये काढू शकतात. यापुढे प्रत्येक एक हजार रुपयांसाठी ५ रुपये किंवा १५० रुपये द्यावे लागणार आहेत.
- सिनियर सिटीझन्स आणि लहान मुलांच्या खात्यांमधून कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही.
- होम ब्रॅन्चमध्ये अॅक्सिस बँकेच्या ग्राहकांना पाच व्यवहारांवर कोणतंही शुल्क लागणार नाही. यानंतर प्रत्येक एक हजार रुपयांसाठी २.५० रुपये किंवा ९५ रुपये यातली जी रक्कम जास्त असेल ती आकारली जाईल.
- अॅक्सिक बँकेच्या दुसऱ्या शाखेमध्ये पाच व्यवहारांवर कोणतंही शुल्क नाही, पण दिवसाला जास्तीत जास्त ५० हजार रुपयेच काढता किंवा टाकता येतील. यानंतर एक हजार रुपयांसाठी २.५० रुपये किंवा ९५ रुपये यातली जी रक्कम जास्त असेल ती आकारली जाईल.
- पहिल्या पाच एटीएम व्यवहारांवर कोणतंही शुल्क आकारण्यात येणार नाही. यानंतर प्रत्येक व्यवहारांवर २० रुपये शुल्क आकारण्यात येईल.
- आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना महिन्यातल्या पहिल्या चार व्यवहारांवर कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही. यानंतर प्रत्येक एक हजार रुपयांसाठी ५ रुपये किंवा १५० रुपये द्यावे लागतील. ज्या शहरामध्ये ग्राहकाचं खातं असेल तिकडेच ही सुविधा मिळणार आहे.
- आयसीआसीआयच्या दुसऱ्या शाखांमध्ये पहिल्या व्यवहारांवर कोणतंही शुल्क लागणार नाही. यानंतर प्रत्येक एक हजार रुपयांसाठी ५ रुपये किंवा १५० रुपये द्यावे लागतील.
- आयसीआयसीआय बँकेच्या होम ब्रॅन्च सोडून इतर ब्रॅन्चमध्ये पैसे भरल्यास प्रत्येक एक हजार रुपयांसाठी ५ रुपये किंवा १५० रुपये शुल्क आकारण्यात येईल.