‘राणेपुत्रा’ची रातोरात जामिनावर सुटका

उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांची जामिनावर सुटका झालीय. दहा हजार रुपयांच्या जामिनावर त्यांची सुटका करण्यात आलीय. त्यांच्यासह इतर चौघांचीही जामिनावर सुटका झालीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 4, 2013, 07:56 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, पणजी
उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांची जामिनावर सुटका झालीय. दहा हजार रुपयांच्या जामिनावर त्यांची सुटका करण्यात आलीय. त्यांच्यासह इतर चौघांचीही जामिनावर सुटका झालीय.
गोव्यात टोल नाक्यावर तोडफोड केल्याप्रकरणी राणे यांच्यासह इतर नऊ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. नितेश यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते सिंधुदुर्गातून गोव्यात जात होते. त्यांना रस्त्यात कलंगूट टोलनाक्यावर टोलसाठी अडवले. मात्र, आपण नारायण राणेंचे पुत्र आहोत अशी ओळख नितेश यांनी दिली. मात्र, गाडी सरकारी नसल्यामुळं त्यांना टोल कर्मचाऱ्यांनी गाडी सोडण्यास नकार दिला. त्यामुळं संतापलेल्या नितेशच्या बॉडी गार्ड्सनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली. तसंच टोल नाक्याचीही तोडफोड केली. यात तीन कर्मचारी जखमी झाले. याप्रकरणी नितेश राणे आणि त्यांच्या नऊ कार्यकर्त्यांविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद करुन त्यांना अटक करण्यात आली. नितेश राणे यांना आपल्या कार्यकर्त्यांसह एक रात्र पोलीस स्टेशनमध्ये काढावी लागणार, अशी शक्यता वर्तवली जात होती.
मात्र, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानं काल रात्री त्यांना आणि इतर चौघांची जामिनावर सुटका झालीय. इतर पाच जणांना आज पेडणे कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, नितेश राणेंकडून याप्रकरणी अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.