www.24taas.com, झी मीडिया, सूरत
लैंगिक शोषणाप्रकरणी पोलिसांच्या हातावर वारंवार तुरी देणाऱ्या आसाराम पुत्र – नारायण साईला बुधवारी सूरतच्या एका कोर्टानं ‘पलायनवादी’ म्हणून घोषित केलंय.
पोलिसांनी याआधीच नारायण साईला फरार म्हणून घोषित केलं होतं. त्याच्या शोर्धार्थ गुजरात पोलिसांनी लुकआऊट नोटीस आणि सर्च वारंटही जारी केलंय. इतकंच नव्हे तर एकापेक्षा जास्त राज्यांत नारायण साईच्या शोधार्थ पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकलेत. परंतु नारायण साई त्यांच्या हाती लागलेला नाही. साई सध्या कुठे लपून बसलाय याबाबतीत पोलिसांना अद्याप कोणतीही सूचना मिळालेली नाही.
सूरत पोलिसांनी चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर न होणाऱ्या नारायण साईला ‘पलायनवादी’ म्हणून घोषित करण्यासाठी सूरत कोर्टात अर्ज दाखल केला होता. न्यायालयानं पोलिसांचा ही मागणी मान्य करत नारायण साईला पलायनवादी घोषित केलंय.
आसाराम आणि नारायण साई यांच्यावर सूरतमध्ये राहणाऱ्या दोन बहिणींनी बलात्कार आणि लैंगिक शोषणाचा आरोप केलंय. मोठ्या बहिणीनं आसारामवर १९९७ पासून २००६ पर्यंत आपल्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केलाय तर छोट्या बहिणीनं आसारामचा मुलगा नारायण साई याच्याविरुद्ध अशीच तक्रार नोंदवलीय.
छोट्या बहिणीच्या म्हणण्यानुसार, २००२ आणि २००५ पर्यंत सूरतच्या आश्रमात तीचं लैंगिक शोषण केलं गेलं. दोन्ही बहिणींनी आसारामची पत्नी आणि मुलीवरही गंभीर आरोप केलेत. दोन्ही मुलींनी केलेल्या तक्रारीनंतर आसाराम आणि नारायण साईविरुद्ध बलात्कार, लैंगिक शोषण आणि बेकायदेशीरपणे व्यक्तीला बंधक बनवून ठेवण्याच्या अनेक तक्रारी समोर आल्यात.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.