मुख्यमंत्री शपथविधीसाठी केजरीवालांचा मेट्रोने प्रवास

आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आज दिल्लीचे सातवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. थोड्या वेळापूर्वीच ते आपल्या गाझियाबाद इथल्या गिरनार अपार्टमेंट या घरातून रामलीला मैदानाकडे निघालेत. केंद्र सरकारच्या सीएनजी गॅस दरवाढीचा निषेध करण्यासाठी त्यांनी मेट्रोनं प्रवास करण्याचा निर्णय घेतला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 28, 2013, 11:12 AM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल आज दिल्लीचे सातवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. थोड्या वेळापूर्वीच ते आपल्या गाझियाबाद इथल्या गिरनार अपार्टमेंट या घरातून रामलीला मैदानाकडे निघालेत. केंद्र सरकारच्या सीएनजी गॅस दरवाढीचा निषेध करण्यासाठी त्यांनी मेट्रोनं प्रवास करण्याचा निर्णय घेतला.
कौशांबी स्टेशनहून ते मेट्रोनं बाराखंभा इथं पोहचतील. तिथून कारनं ते रामलीला मैदानात दाखल होतील आणि याच ठिकाणी केजरीवालांचा शपथविधी सोहळा होणार आहे. हा सोहळा सा-यांसाठी खुला असणार आहे. यात कोणीही व्हीआयपी असणार नाही. केजरीवाल यांचे आईवडीलही सामान्यांमध्ये बसणार आहे.
व्यासपीठावर राज्यपालांशिवाय केजरीवाल आणि त्यांचे सहा मंत्री असतील. शपथविधी सोहळ्यानंतर केजरीवाल आपल्या मंत्र्यांसह राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन घेतील आणि त्यानंतर नवीन कॅबिनेटची बैठक पार पडेल. या शपथविधी सोहळ्याला केजरीवालांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना आमंत्रण पाठवलंय.. मात्र ते या सोहळ्यात सहभागी होण्याची शक्यता कमी आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.