दहशतवादी असल्याच्या संशयाने फिरोजपूर लष्करी छावणीत गोंधळ

पठाणकोट हल्ल्यानंतर लष्करी छावण्यांमधील सावधानता वाढली आहे. थोडीही पाल चुकचुकली तरी जवान त्याची पूर्ण खबर घेतात. पंजाबमधील फिरोजपूर येथील लष्करी छावणीत मंगळवारी टेलिफोन लाईनचे काम करण्यासाठी भिंतीवर चढलेले कर्मचारी दहशतवादी असल्याचा समज झाल्यामुळे एकच गहजब उडाला. साधारण तासभर हा सर्व गोंधळ सुरू होता आणि या काळात लष्करी छावणीचा संपूर्ण परिसर खाली करण्यात आला. 

Updated: Jan 13, 2016, 12:23 AM IST
दहशतवादी असल्याच्या संशयाने फिरोजपूर लष्करी छावणीत गोंधळ title=

फिरोजपूर : पठाणकोट हल्ल्यानंतर लष्करी छावण्यांमधील सावधानता वाढली आहे. थोडीही पाल चुकचुकली तरी जवान त्याची पूर्ण खबर घेतात. पंजाबमधील फिरोजपूर येथील लष्करी छावणीत मंगळवारी टेलिफोन लाईनचे काम करण्यासाठी भिंतीवर चढलेले कर्मचारी दहशतवादी असल्याचा समज झाल्यामुळे एकच गहजब उडाला. साधारण तासभर हा सर्व गोंधळ सुरू होता आणि या काळात लष्करी छावणीचा संपूर्ण परिसर खाली करण्यात आला. 

या परिसरातील भिंतीवर दोन संशयित व्यक्ती दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्करी हालचालींनी वेग घेतला आणि सुरक्षेच्या कारणास्तव हा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला. त्यानंतर लष्कराच्या शीघ्र कृती दलाची एक तुकडी या परिसरात तैनात करून शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. 

मात्र, दरम्यानच्या काळात, या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर त्या दोन संशयित व्यक्ती लष्कराच्या सिग्नल रेजिमेंटमधील टेलिफोन लाईन्सचे काम करणारे कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाले. या परिसरातील बिघडलेल्या फोन लाईनची दुरूस्ती करण्यासाठी हे कर्मचारी भिंतीवर चढले होते. 

मात्र, सध्या पठाणकोट हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पंजाबमध्ये हाय अलर्ट असल्याने संशयित व्यक्तींच्या दिसण्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. या परिसरातील शाळांमध्ये मुलांना घरी आणण्यासाठी पालकांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली होती. 

दरम्यान, फिरोजपूरचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक हरदयाल सिंग यांनी अतिरेक्यांनी गोळीबार केल्याच्या अफवा निराधार असल्याचे स्पष्ट केले. पठाणकोट येथील वायुसेनेच्या तळावर सहा अतिरेक्यांनी काही दिवसांपूर्वी हल्ला चढवला होता. या दहशतवाद्यांचा खात्मा करताना भारतीय लष्कराचे सात जवान शहीद झाले होते.