www.24taas.com, नवी दिल्ली
दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणात दिल्लीकरांचा संताप शिगेला पोहचलाय. आज सायंकाळी पाच वाजल्याच्या सुमरास पुन्हा एकदा आंदोलक आणि पोलिसांमध्ये पुन्हा झटापट झाली. यावेळी पोलिसांचा आंदोलकांवर पुन्हा लाठीचार्ज केला तर संतप्त आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आलीय. त्यामुळे विजय चौकाचं रुपांतर तहरीर चौकात झाल्याचं पाहायला मिळालं.
दिल्लीतला राष्ट्रपती भवनासमोर पुन्हा आक्रमक निदर्शनं पाहायला मिळाली तर आंदोलकांच्या शांत होण्याची वाट न पाहताच दिल्ली पोलिसांनी विजय चौक मोकळा करण्याची कारवाई सुरू केली त्यामुळे आंदोलक आणखीनच चिडले. त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. जमावाला आवरण्यासाठी पोलिसांनी पुन्हा अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, पाण्याचे फवारे सोडले आणि जमावाला पांगवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. दिल्लीत सध्या जोरदार थंडी पडलीय.
पण, अजूनही आंदोलक मात्र मागे हटण्यास तयार नाहीत. आंदोलकांना विजय चौकात पाठिमागे सारण्यात पोलिसांना यश आलंय. राष्ट्रपती भवनाकडे जाण्याचा मार्ग अखेरीस पोलिसांनी मोकळा केलाय.