www.24taas.com, नवी दिल्ली
विमान खरेदी घोटाळा प्रकरणामुळं राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेलांना चांगलेच अडचणीत आलेत. कॅगने ताशेरे ओढल्यानंतर आता सुप्रीम कोर्टानं त्यांना चांगलाच दणका दिलाय. त्यामुळं पटेलांच्या अडचणीत भर पडणार आहे.
कोळसा घोटाळ्यामुळं काहीसं दुर्लक्षित असलेलं विमान खरेदी घोटाळा प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या फटका-यानं पुन्हा चर्चेत आलंय. यामुळं राष्ट्रवादीचे नेते आणि युपीए सरकारमधील अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल चांगलेच अडचणीत सापडलेत. कोर्टानं प्रफुल्ल पटेलांच्या विरोधातील एका याचिकेवर सुनावणी करताना केंद्र सरकार आणि केंद्रीय दक्षता आयोगास नोटीस बजावली आहे. विमान खरेदी प्रकरणात तत्कालीन नागरी हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेलांची सीबीआय चौकशी का करण्यात येवू नये. असा प्रश्न सुप्रीम कोर्टानं केंद्रीय दक्षता आयोगास केलाय. पटेल नागरी हवाई वाहतूक मंत्री असताना 111 विमानं 67 हजार कोटी रुपयांना घेतली होती. यामध्ये घोटाळा झाला असून त्यासंदर्भात कॅगनंही ताशेरे ओढलेत. असं कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत पटेलांवर आरोप आहेत.
विमान खरेदी प्रकरणाबरोबरच विमानं भाड्यानं देणं, फायद्यातल्या मार्गांवर विमान न चालवण्याबद्दलही ते आरोपांच्या फे-यात अडकलेत. कोर्टाच्या नोटीसीला केंद्र आणि सीवीसी काय उत्तर देतं याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय.