नवी दिल्ली : केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी एक धक्कादायक माहिती बुधवारी लोकसभेत सादर केली. देशात विकल्या जाणाऱ्या एकूण दुधापैकी ६८% दूध अन्न सुरक्षेच्या नेमून दिलेल्या गुणवत्तेत बसत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
२०११ साली सरकारने देशभरात दूध भेसळीसंदर्भात एक सर्वेक्षण केले होते. त्यावर आधारित आकडेवारी त्यांनी लोकसभेत सादर केली. याहूनही धक्कादायक बाब म्हणजे, दुधावर जिथे प्रक्रिया केली जाते त्या ठिकाणी कमालीची अस्वच्छता, आरोग्यदायक सोयी आणि सुरक्षात्मक सोयींचा अभाव असल्याचेची आढळून आलंय.
अनेक ठिकाणी पाश्चरायझेन करण्याच्या यंत्रांची सफाई कपडे अथवा भांडी धुण्याच्या साबणाने केली जाते. हा साबण त्यानंतर नीट धुतलाही जात नाही. त्यामुळे दुधाच्या अनेक पिशव्यांमार्फत हा साबण ग्राहकांच्या पोटापर्यंत प्रवास करतो. दुधाचा दाटपणा वाढवण्यासाठी युरिया, स्टार्च, ग्लुकोज आणि फॉर्मलीन अशा काही घटकांचीही भेसळ केली जाते.
ही भेसळ ग्राहकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करते. यामुळे फूड पॉयझनिंगचा धोका तर सामान्य असतो. पण, यामुळे शरीराचे काही अवयव निकामी होणे, कर्करोग होणे, हृदयासंबंधी विकार होणे असे धोकेही उत्पन्न होऊ शकतात.
आता या भेसळीला आवर घालून लोकांच्या आयुष्यासोबत हेळसांड कशी थांबवावी? या विचारात केंद्र सरकार आहे.