www.24taas.com, वृत्तसंस्था, चेन्नई
एअर इंडियाच्या एका विमानाच्या शौचालयात तब्बल ३२ किलोचं सोनं सापडलंय. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आलीय. आंतरराष्ट्रीय बाजारात या सोन्याची किंमत जवळजवळ १५ करोड रुपये असल्याचं सांगण्यात येतंय.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इंटेलिजन्स संचलनालयाच्या अधिकाऱ्यांनी मूळच्या केरळच्या अब्दुल गफूर नसरून आणि मोहम्मद जैनुल हुसैन यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. हे दोघंही सकाळी साडे पाचच्या सुमारास दुबईहून भारतात दाखल झाले होते.
पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर या दोघांनी आपण सोन्याची तस्करी केल्याचं कबूल केलं. सोनं कुठंय? हा प्रश्न विचारल्यानंतर या दोघांनी ३२ किलोची सोन्याची बिस्कीटं ज्या विमानातून भारतात आलो, त्याविमानातील शौचालयात लपवून ठेवल्याचं पोलिसांना सांगितलं.
साहजिकच, शौचालयात सोनं का दडवून ठेवला हा प्रश्न विचारल्यानंतर या दोघांनी त्यांच्या आणखी दोन साथीदारांची नावं घेतली आणि या चौघांचा भांडा फुटला. मोहम्मद युसुफ अब्दुल आणि मोहम्मद यासिन अब्दुल हुसैन हे त्यांचे दोन साथीदार दिल्लीला याच विमानानं जाणार होते. तिथून हे शौचालयात दडवून ठेवलेलं सोनं ताब्यात घेणार होते...
ही माहिती मिळाल्यानंतर, ६ वाजून ४० मिनिटांनी दिल्लीला रवाना होणाऱ्या याच विमानात तयार असलेल्या या दोघांना पोलिसांनी अटक केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.