www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
याकूब मेमनच्या फाशीवर सुप्रिम कोर्टानं स्थगिती दिली आहे. याकूब मेमनचा दयेचा अर्ज दहा दिवसांपूर्वीच राष्ट्रपतींनी फेटाळला होता. याकूबची याचिका आता घटना पीठाकडे विचारार्थ पाठवण्यात आलाय. १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी फाशी ठोठावण्यात आलेला याकूब मेमन एकमेव आरोपी आहे.
या याचिकेवर खुल्या न्यायालयात सुनावणी व्हावी का? यावर आता घटना पीठ निर्णय देणार आहे. गेल्या २० वर्षांहून अधिक काळ तुरूंगात असल्याचं याकूबनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलंय. या याचिकेवर सुनावणी न्यायाधिशांच्या चेंबरमध्ये न होता खुल्या न्यायालयात व्हावी अशी मागणीही याकूबने केली आहे. याच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याकूबच्या आव्हान याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा निर्णय दिला. ही याचिका न्यायालयाने घटना पीठाकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई बॉम्बस्फोटांप्रकरणी याकूब मेमनला टाडा न्यायालयानं फाशीची शिक्षा ठोठावली होती. सर्वोच्च न्यायालयानं ती शिक्षा कायम ठेवली होती. त्यानंतर याकूबनं केलेला दया अर्ज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दहा दिवसांपूर्वीच फेटाळला होता. मात्र, याकूबनं पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.
याकूब हा मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांचा फरार सूत्रधार आणि प्रमुख आरोपी मुश्ताक ऊर्फ टायगर मेमन याचा भाऊ आहे. टायगर मेमन सध्या फरार आहे. तर याकूब तुरुंगात शिक्षा भोगतो आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.