www.24taas.com, नवी दिल्ली
भाजप नेते राम जेठमलानींनी अपेक्षेप्रमाणे भाजप अध्यक्ष नितीन गडकरींवर तोफ डागलीय़. नितीन गडकरी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जेठमलानी यांनी केलीय.
आजपत्रकार परिषदेत जेठमलानी म्हणाले, स्वामी विवेकानंद यांच्यावर केलेल्या टीकेनंतर गडकरींनी अध्यक्षपदावर राहू नये. गडकरींना विवेकानंद आणि दाऊद इब्राहिममधील फरक समजत नसेल, तर कठीण आहे. गडकरींना राजीनामा देण्यास उशीर होत असल्याने पक्षाचे नुकसान होत आहे. गडकरींना पुन्हा अध्यक्षपदावर पाहण्याची माझी इच्छा नाही, असे ते म्हणालेत.
गडकरी हे स्वत:हून राजीनामा देतील अशी अपेक्षा होती असं सांगत राजीनामा दिल्यानं आरोप सिद्ध होत नाही त्यामुळं चौकशी सुरू असेपर्यंत गडकरींनी राजीनामा द्यावा असं त्यांनी नमूद केलंय. गडकरींच्या दुस-यांदा अध्यक्ष होण्यावर भाजपमधील काही ज्येष्ठ नेते नाराज आहेत. तसंच ते एकमेकांच्या संपर्कात असल्य़ाचा दावाही जेठमलानींनी केलाय.
जसवंत सिंग, यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा नाराज असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केलाय.
गेल्या अनेक दिवसांपासून गडकरी यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण भेट मागितली होती. तसेच त्याबाबत पत्रही पाठवले होते. मात्र आपल्याला अजूनही भेट मिळालेली नाही असंही त्यांनी सांगितलंय.
गडकरी हे पंतप्रधान नाहीत. गेल्या मे महिन्यापासून मी गडकरींना भेटण्यासाठी त्यांची वेळ मागत आहे. मात्र, अद्याप ते मला भेटलेले नसल्याचे, जेठमलानी यांनी सांगितले. मी स्वतः भाजप सोडणार नाही. मी भाजपमध्ये राहून काम करत राहीन. मी पक्ष सोडला तर देशाची फसवणूक होईल, असे जेठमलानी यांनी स्पष्ट केले.
नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार आहेत. मात्र त्यांच्याकडे पक्षाध्यक्ष होण्यासाठी वेळ नसल्याचं सांगत मोदीविरोधकांनाही जठमलांनीनी टोला हाणलाय.