www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
लोकसभा निवडणूक २०१४ च्या पार्श्वभूमीवर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना प्रत्यूत्तर म्हणून काँग्रेसकडून युवराज राहुल गांधींचं नाव पुढे करण्यात येईल, अशी चर्चा गेले कित्येक दिवसांपासून सुरू होती. परंतु, ‘तुर्तास तरी राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत’ असं आता काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात येतंय.
काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून आताच घोषणा केली जाणार नाहीय. त्यांच्याकडे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचाराची धुरा तेवढी सोपवण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. निवडणुकीआधी पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्याची परंपरा नाही, असं मत सोनिया गांधींनी काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत व्यक्त केल्याचं समजतंय.
येत्या १७ जानेवारी रोजी काँग्रेसच्या अधिवेशनात पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधींचं नाव जाहीर होणार नाही, असं आता स्पष्ट दिसतंय. परंतु, राहुल गांधी काँग्रेसच्या प्रचारासाठी जोरदार प्रयत्न करणार आहेत.
काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षात पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्याची परंपरा नाही, असं म्हटलंय. लोकसभा निवडणुकीनंतरच काँग्रेसचे वरिष्ठ नेते पंतप्रधान पदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर करतील, असं त्यांनी स्पष्ट केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.