मुंबई : ऊब देणारी बाजरीची भाकरी, बाजरीची खिचडी यांचा अंतर्भाव करता येतो. मात्र, बाजरीतील उष्णता बाधू नये म्हणून, बरोबरीने तूप, लोणी घेणे आवश्यक असते. नेहमीच्या धान्यांपैकी गहू, तांदूळ, ज्वारी यांचे सेवन करता येते.
मसालेभात, फोडणीची खिचडी
मात्र, हिवाळ्यात साध्या भाताऐवजी मसालेभात, फोडणीची खिचडी यांचे प्रमाण वाढवता येते. गव्हाच्या पिठात तिखट, मीठ, हळद वगैरे मसाल्याचे पदार्थ टाकून ठेपले बनवता येतात. ज्वारी-बाजरीची मिश्र भाकरी रुचकर लागते व अधिक चांगल्या प्रकारे पचते.
दूध, लोणी, ताक, तूप
दूध, लोणी, ताक, तूप हे रोजच्या खाण्यात असावेत, असे पदार्थ हिवाळ्यातही खाण्यास उत्तम असतात. हिवाळ्यात ऊब मिळावी म्हणून दुधात सुंठ, केशर वगैरे घालता येते.
काळी मिरी, आले, लसूण, कोथिंबीर
लोण्यामध्ये काळी मिरी, आले, थोडासा लसूण, कोथिंबीर घातली तर ते अतिशय रुचकर लागते आणि शरीराला स्निग्धता व ऊब दोन्ही देऊ शकते. ताकातही आले-पुदिन्याचा रस टाकला, कधी तरी तूप-जिरे-हिंगाची फोडणी दिली तर हिवाळ्यात ऊब टिकण्यास मदत मिळते.
मटकी, तूर, उडीद, कुळीथ, वाल
कडधान्यांमध्ये मटकी, तूर, उडीद, कुळीथ, वाल हे इतर कडधान्यांच्या मानाने उष्ण असतात. प्रकृती आणि पचनशक्तीचा विचार करून यांचाही आहारात समावेश करता येतो.
ऊब टिकवण्यासाठी, ऊब देण्यासाठी मसाल्याचे पदार्थ उत्तम असतात. हळद, आले, हिंग, लसूण, मोहरी, मिरची, कोथिंबीर, मेथ्या, पुदिना, ओवा, मिरी, लवंग, तमालपत्र, दालचिनी, जायफळ, तीळ वगैरे मासाल्याचे पदार्थ हिवाळ्यात वापरणे उत्तम असते. भाज्या बनवताना या द्रव्यांची व्यवस्थित योजना केली, तर त्या रुचकर होतात, सहज पचतात आणि ऊब देतात.
भाज्या
भाज्यांमध्ये शेवग्याच्या शेंगा, परवर, कर्टोली, गाजर, मुळा वगैरे भाज्या उष्ण गुणाच्या असतात; मात्र इतर पथ्याच्या भाज्याही मसाल्याचे पदार्थ टाकून रुचकर बनवल्या तर ऊब टिकविण्यास मदत करतात.
ऊब देण्यास उत्तम
बदाम, काजू, चारोळी, पिस्ता, अक्रोड हा सुका मेवाही ऊब देण्यास उत्तम असतो. हिवाळ्यामध्ये पचनशक्ती उत्तम असताना हे पदार्थ खाताही येतात. प्रकृतीचा विचार करून यांचे प्रमाण ठरवावे लागते.
पाणी
हिवाळ्यात प्यायचे पाणी गरम वा कोमट असणे उत्तम होय. जेवताना गरम पाणी पिण्याने अन्नपचन व्यवस्थित होण्यास मदत मिळते. तसेच एरवीसुद्धा गरम पाणी पिण्याने ऊब मिळण्यास मदत मिळते.
ज्वारी-बाजरीच्या भाकरीबरोबर गूळ-तूप
ज्वारी-बाजरीच्या भाकरीबरोबर गूळ-तूप खाणे, जेवणात तिळाची चटणी, लसणाची चटणी, ओली हळद-आंबेहळद यांच्यापासून बनविलेले लोणचे यांचा समावेश असणे, तिळाची चिक्की खाणे, सकाळी सुंठ-गूळ-तुपाची गोळी खाणे, रोज डिंकाचा लाडू, मेथीचा लाडू वा अहळिवाचा लाडू खाणे, जेवणानंतर ओवा-तीळ-बाळंतशोपा वगैरे द्रव्यांपासून बनवलेली सुपारी खाणे, भोजनानंतर त्रयोदशगुणी विडा खाणे वगैरे साध्या उपायांनीही हिवाळ्यात ऊब मिळण्यास खूप चांगली मदत मिळते.