मुंबई : हिवाळ्यात त्वचेच्या ब-याच तक्रारी उद्भवतात. साधारणत: त्वचेचा कोरडेपणा, पापुदे निघणं, त्वचा निस्तेज होणं, काळपटपणा असं त्या तक्रारींचं स्वरूप असतं.
उन्हाळ्यात आपली त्वचा नियमितपणे घामाला शरीराबाहेर फेकण्याचं काम करत असते. त्यामुळे त्वचेच्या तक्रारी उद्भवत नाहीत. घामामुळे त्वचेची रंध्रं उघडी राहतात.
आपण जे चरबीयुक्त पदार्थ सेवन करतो, त्यांचा तेलकटपणा रंध्रातून बाहेर पडत असतो. त्यामुळे शरीराची त्वचा कोरडी पडत नाही. परंतु हिवाळ्यात जसजशी थंडी वाढत जाते, तसतशी त्वचेतून घाम बाहेर येण्याची प्रक्रिया बंद होते.
परिणामी त्वचेत विकार उत्पन्न होतात. त्वचा निर्जीव होते आणि थोराड दिसते. त्यामुळेच शरीरातून भरपूर घाम निघणं गरजेचं असतं.
शरीराला हिवाळ्यात घाम येण्यासाठी खालील काही गोष्टी करता येतात.
* व्यायाम करा पण त्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी प्या.
* त्यानंतर संपूर्ण शरीराची तळहाताने मालिश करा.
* त्यासाठी टॉवेलचा वापरही(तळहाताऐवजी) करता येतो.
* शरीरात योग्य ती उष्णता जाणवू लागल्यावर वीस ते पंचवीस मिनिटं व्यायाम करा.
हा व्यायाम असा असावा ज्यामुळे घाम येईल. सुरुवातीला तीन-चार दिवस घाम येणार नाही. परंतु हळूहळू त्वचा सक्रिय होईल आणि घाम येण्यास सुरुवात होईल. व्यायामामुळे दुहेरी फायदा मिळतो. एक तर शरीराला भरपूर ऑक्सिजन मिळतो आणि दुसरं म्हणजे घाम येतो.
शरीराने सदृढ असणाऱ्या व्यक्तींसाठी व्यायाम चांगला आहे. परंतु वृद्ध आणि शरीराने कमकुवत व्यक्ती व्यायाम करू शकत नाहीत. त्यांच्यासाठी दुसरा मार्ग आहे.
* एका बादलीत गरम पाणी घ्या. हे पाणी पायाला सहन होईल एवढंच गरम असावं.
* त्या पाण्यात पाय सोडून बसायचं. पाणी साधारणत: पोटऱ्यांपर्यंत असावं.
* जाडशी चादर शरीराला लपेटून घ्या. त्या चादरीखाली पाण्याची बादलीही यायला हवी.
* वीस-पंचवीस मिनिटं झाल्यावर शरीराला घाम सुटण्यास सुरुवात होईल.
* पाणी जरा थंड वाटत असेल तर त्यात अधून-मधून गरम पाणी टाकत राहा.
घाम बाहेर निघण्यासाठी निसगोर्पचाराची ही एक उत्कृष्ट पद्धत आहे. पाश्चात्य देशात अतिथंडीमुळे घाम निघणं शक्यच नसतं. मग तिथली लोकं टब बाथ वापरू लागली. साधारणत: सुटीच्या दिवशी टबमध्ये गरम पाणी टाकण्यात येतं. त्यामुळे शरीराला उष्णता तर मिळतेच शिवाय त्वचेची रंध्रंही मोकळी होतात.
वरील उपाय केल्याने त्वचेचे विकार आपल्याकडे फिरकतसुद्धा नाहीत. त्वचेशी संबंधित अन्य आजार होण्याचा धोकही टळतो. उलट त्वचा नितळ आणि निरोगी बनते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.