मुंबईत आजारांनी डोक काढलं वर

सध्या हवामानातील बदलाचा मुंबईकरांना चांगलाच फटका बसलाय. मुंबईत व्हायरल फिव्हर, मलेरीया आणि डेंग्यू सारखे साथीचे आजार बळावू लागलेत. याचबरोबर सर्दी-खोकला आणि गॅस्ट्रोसदृश्य आजारांनीही डोकं वर काढलं आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 15, 2013, 01:16 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सध्या हवामानातील बदलाचा मुंबईकरांना चांगलाच फटका बसलाय. मुंबईत व्हायरल फिव्हर, मलेरीया आणि डेंग्यू सारखे साथीचे आजार बळावू लागलेत. याचबरोबर सर्दी-खोकला आणि गॅस्ट्रोसदृश्य आजारांनीही डोकं वर काढलं आहे.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून ऊन-पावसाचा पाठशिवणीचा खेळ पाहायला मिळतोय. अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी आणि कडक ऊनाचा सामना मुंबईकरांना करावा लागत असल्यानं त्यांचे आरोग्य मात्र बिघडू लागलंय. मान्सूनचा मुक्काम इतिहासात पहिल्यांदाच इतका लांबला आहे की ज्यामुळं साथीचे आजार वाढण्यास मदत झालीय. येत्या २-३ दिवसांत गुजरातमधून परतीच्या मान्सूनला सुरुवात होईल. अशी शक्यता वर्तवण्यात येतंय.
मुंबईतील हवामान बदल साथीच्या आजारांना निमंत्रण देणारा ठरत आहे. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात तापाचे १८६३, मलेरियाचे १७५, डेंग्यूचे ३७, गॅस्ट्रोचे १४९ रुग्ण आढळले आहेत. याबरोबरच डोळ्यांची जळजळ, खोकला, डोकेदुखी असे आजारही मोठ्या प्रमाणात दिसून आलेत. हवामानात होणा-या वारंवार बदलामुळं प्रतिकार शक्ती कमी होवून साथीच्या आजारांना आपले शरीर बळी पडत असल्याचं मत डॉक्टरांनी व्यक्त केलं.
मलेरिया, डेंग्यूचा प्रसार डासांमार्फत होत असल्यानं डासांपासून बचाव, पाणी उकळून पिणे, अंगावर ताप न काढणे, बाहेरील खाद्यपदार्थ खाणे शक्यतो टाळणे, उन्हात जाताना काळजी घेणं. आजार टाळण्यासाठी गरजेचं आहे. हवामानातील बदल आणखी थोडे दिवस तरी कायम राहणार असल्यामुळं मुंबईकरांनो आरोग्य सांभाळा.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.