मुंबई : रक्तदान हे जगातील एक सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदानासारखे दुसरे कोणतेही अमुल्य गीफ्ट नाही. त्यात गंमत अशी की हे गीफ्ट तुम्ही कोणाला देताय हे बहुतेकवेळा तुम्हाला माहितही नसते. यापेक्षा दुसरे निस्वा:र्थी कृत्य नाही.
आज १४ जून. १४ जून हा वर्ल्ड ब्लड डोनर डे (जागतिक रक्तदाता दिवस) म्हणून मानला जातो. ज्या व्यक्तींनी आजपर्यंत रक्तदान केले त्यांचे आभार मानण्याकरिता तसेच रक्तदानाचे महत्त्व लोकांना पटवून देण्याकरिता वर्ल्ड हेल्थ ऑरर्गनायजेशनने (जागतिक आरोग्य संस्था) २००४ पासून या दिवसाची सुरवात केली.
तुमच्यातील अनेक जणांनी रक्तदान स्वत:हून किंवा गरजेपोटी केले असेल. मात्र रक्तदान कधी, कुठे, करावे, कोणती कोळजी घ्यावी या बाबी बघणेही तितकेच गरजेचे आहे. चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या वेळी, तसेच चुकीच्या मार्गदर्शनाखाली जर रक्तदान केले तर अनेक आजार होण्याचा धोका असतो.
रक्तदान करतांना घ्या ही काळजी
१. रक्तदान करण्यास पात्र आहात का ?
तुमची इच्छा असो वा गरज पण रक्तदान करण्यासाठी आपण पात्र आहोत का नाही हे बघणे जरूरी आहे. जर तुम्ही नुकतेच रक्तदान केले असेल, बाहेरगावी जाऊन आला असाल, शारीरिक संबंध केले असतील तर तुम्ही रक्तदान करण्यास थोडे दिवस तरी पात्र नाही आहात.
२. शरिरातील लोहाचे प्रमाण
रक्तदानापूर्वी शरीरातील आयर्न लेवल तपासून घेणे. शरीरात जर लोहाचे प्रमाण जास्त असेल तरच तुम्ही रक्तदान करू शकता.
३. दारू, सिगारेट टाळा
रक्तदान करण्याच्या किमान एक दिवस आधीपर्यंत दारूचे सेवन करू नका. रक्तात झालेली दारूची भेसळ ही रूग्णाच्या आरोग्याकरिता फार धोकादायक आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला स्मोकिंगचे व्यसन असेल तर किमान रक्तदानाच्या किमान एक तास आधी सिगारेट फुकू नका.
४. सैल कपडे घाला
रक्तदान करायला जात असतांना घट्ट कपडे घालू नका. शक्यतो सैल कपडे घाला.
५. आजारी असल्यास टाळा
जर तुम्ही स्वत:च आजारी असाल किंवा काही दिवसांपूर्वीच आजारातून उठला असाल तर रक्तदान करणे टाळा. प्लेटलेट्स, पेशी, प्लाजमाचे दान केले असेल तर तुम्ही रक्तदान करण्यास पात्र नाही. या गोष्टी रक्तदान झाल्यानंतरही काही काळ टाळा.
६. जास्तीत जास्त द्रवपदार्थ घ्या
रक्तदानाच्या वेळी तुमच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होते तसेच तुम्हाला अशक्तपणा जाणवू शकतो. त्यामुळे रक्तदान झाल्यानंतर द्रवपदार्थांचे सेवन जास्त करा.