www.24taas.com, नवी दिल्ली
कॅन्सर पेशंटसना आता स्वस्त दरात कॅन्सरची औषधं स्वस्त मिळणार आहेत. नोवार्टिस कंपनीनं दाखल केलेली याचिका कोर्टानं फेटाळल्यानं भारतीय पेशंटसना मोठा दिलासा मिळाला.
सुप्रीम कोर्टानं दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामुळे भारतीय कॅन्सर पेशंटसना मोठा दिलासा मिळालाय. कॅन्सरच्या औषधासंदर्भात नोव्हार्टिस कंपनीनं पेटंटचा दावा केला होता. पण सुप्रीम कोर्टानं हा दावा फेटाळल्यानं भारतीय कंपन्या आता ग्लिवेक हे औषध तयार करू शकणार आहेत. आतापर्यंत नोव्हार्टिसच्या औषधांसाठी महिन्याकाठी सव्वा लाख रुपये खर्च करावे लागत होते. आता भारतीय कंपन्यांनी औषध तयार केल्यानंतर महिन्याला औषधाचा खर्च साधारण आठ ते दहा हजारांपर्यंतच येणार आहे. म्हणजेच नव्वद हजारांची बचत होणार आहे.
कॅन्सरच्या औषधाचं पेटंट मिळवण्यासाठी स्विस कंपनी नोवार्टिस कंपनीनं 1996 मध्ये चेन्नईमध्ये पेटंट ऑपिसमध्ये अर्ज दाखल केला होता. नोवार्टिस कंपनीचं औषध भारतीय कंपन्यांच्या औषधाच्या तुलनेत रुग्णांच्या शरीरात लवकर शोषलं जातं, असा दावा नोवार्टिसनं केला होता. पण जर एखादं औषध इतर औषधांपेक्षा पूर्णपणे वेगळंच असेल तरच पेटंट मिळू शकतं, असं सांगत पेटंट ऑफिसनं हा दावा फेटाळून लावला. आणि याच कारणावरुन सुप्रीम कोर्टानंही नोवार्टिसचा दावा फेटाळला. आता कॅन्सरबरोबरच, HIV, किडनी, आणि ब्रेन ट्युमरच्या औषधांसाठीही हाच निर्णय लागू होणार आहे. त्यामुळे रुग्णांना त्यांच्या उपचारांपेक्षाही मोठा दिलासा मिळालाय.