नवी दिल्ली: एकीकडे तंबाखूजन्य पदार्थांवरील बंदीचा मुद्दा असतांनाच दुसरीकडे भारतात कँसरमुळे दररोज १३०० जणांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.
२०१४ मध्ये कर्करोगामुळे दररोज सुमारे १,३०० जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती भारतीय वैद्यक संशोधक परिषदेच्या (आयसीएमआर) अहवालातून समोर आली आहे. भारतात सर्वाधिक मृत्यू कँसरमुळेच होतात असा दावाही केला जात आहे.
आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार २०१२ ते २०१४ या कालावधीत कँसरमुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१४ मध्ये देशभरातील कँसर रुग्णाच्या २८ लाख २० हजार १७९ रुग्णांपैकी ४ लाख ९१ हजार ५९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २०१३ मध्ये २९ लाख २४ हजार ३१४ रुग्णांपैकी ४ लाख ७८ १८० रुग्णांचा तर २०१२ मध्ये ३० लाख १६ हजार ६२८ रुग्णांपैकी ४ लाख ६५ हजार १६९ जणांचा मृत्यू झाला होता.
वृद्धांची वाढती संख्या, आरोग्यास घातक ठरणारी जीवनशैली, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचं वाढतं प्रमाण अशा विविध कारणांमुळे कँसरमुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढत असल्याचं आयसीएमआरनं म्हटलं आहे.
कँसरपाठोपाठ टीबीमुळे मृत्यू होणाऱ्यांचे रुग्ण दुसऱ्या क्रमांकावर आहेत. टीबीमुळे २०१३ मध्ये तब्बल ५७ हजारहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला होता, असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.