www.24taas.com, ब्रिगेडीअर हेमंत महाजन
युद्ध नको असेल तर युद्धाची तयारी करा
श्री नरेंद्र मोदी यांनी ‘सार्क’ राष्ट्रांना शपथविधी समारंभाचे निमंत्रण देऊन, आपण देशात कसे कार्यरत राहणार आहोत आणि भारताच्या नवीन विदेश नीतीबाबत एक झलक दाखवणारे पाउल टाकले आहे. पण यामुळे लगेच शांतता प्रस्थापित होइल का? भारतीय दूतावासावर झालेला हल्ला काय दर्शवतो?
पाकिस्तान द्विपक्षीय संबंधांबाबत प्रामाणिक आहे का? एकाबाजूने चर्चा आणि दुसऱ्या बाजूने घुसखोरी आणि दहशतवादास खतपाणी चालू राहिल्यास दोन्ही राष्ट्रात खर्यात अर्थाने संबंध प्रस्थापित होऊ शकतील का? जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे रविवारी सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू काशा ठार झाला आहे. रविवारीच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका पोलिस जवान हुतात्मा झाला, तर एक जण जखमी झाला. जर तुम्हाला युध्द नको असेल तर युध्दाची तयारी करा.
संरक्षणदलांच्या आधुनिकीकरणाचा वेग वाढवा
काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यात बीजेबेहारा येथे वायुदलाचे मिग २१ विमान कोसळले. या दुर्घटनेत वैमानिक रघू बन्सी यांचा मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिकट आव्हानांची जाणीव करुन देणारी ही दुर्घटना आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारली.
त्यांच्यापुढे तिन्ही संरक्षणदलांच्या आधुनिकीकरणाचा वेग वाढवणे , दुर्घटना रोखणे हे मोठे आव्हान आहे. भारत-चीन सीमेवरील चीनच्या बाजूचे रस्ते, रेल्वे लाईन, विमानतळे सक्षम करणे जरुरी आहे. चीनचे सर्व रस्ते सीमेपर्यंत पोहोचलेले आहेत. यामुळे ५-६ लाख सैन्य भारत चीन सीमेवर आणु शकतो. रस्ते बांधणीमध्ये आपण मागील दहा वर्षात ज्या प्रकारे मागे पडलो होतो त्यात सुधारणा करून आगामी काळात हे रस्ते सीमेपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे.
मागील दहा वर्षात संरक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक महत्त्वाच्या करारांवर विशेष प्रगती झालेली नाही. सततच्या दुर्घटना, भ्रष्टाचाराचे आरोप, लांबणीवर पडलेले महत्त्वाचे करार यामुळे संरक्षण क्षेत्राच्या आधुनिकीकरणाचा वेग मंदावला आहे. अशा निराशाजनक वातावरणात मिग विमानांच्या दुर्घटनांमुळे भर पडत आहे. प्रत्येक विमान अपघातामुळे देशाचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे, तसेच भारताला स्वतःचे अत्यंत गुणी असे वैमानिक गमवावे लागत आहेत. आपण नव्या संरक्षण मंत्रांपुढील /लष्कर प्रमुखांपुढे कोणती आव्हाने आहेत हे पाहूया.
आव्हाने दोन प्रकारची
आव्हाने प्रचंड आहेत. ही दोन प्रकारची आहेत. त्यापैकी एक म्हणजे, बाह्य सुरक्षा म्हणजे पाकिस्तान, चीन सीमेची सुरक्षा. हे सैन्याचे क्रमांक एकचे काम असते आणि दुसरे देशांतर्गत सुरक्षेसाठी सरकारला मदत करणे हे होय. बाह्य सुरक्षिततेसाठी भारत पाक एलओसीवर भारतीय सैन्य तैनात केलेले आहे. चीनी सीमेवरपण भारतीय सैन्य तैनात आहे.
या दोन सीमांचे रक्षण आणि या दोन शत्रूंशी युद्ध करण्याकरता तयारी हे सेनेचे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. गेल्या दहा वर्षांपासून झालेल्या चुका नव्या लष्कर प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली दुरुस्त झाल्या पाहिजेत आणि सैन्य अधिक सक्षम झाले पाहिजे. ते कसे करावे यावर आपण पुढच्या काही भागात चर्चा करु.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.