www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेनेचे उमेदवार राहुल नार्वेकर यांनी ऐनवेळी विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतल्यानं शिवसेनेला जबर धक्का बसलाय. विशेष म्हणजे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेदेखील याबाबत अंधारात होते. एव्हढंच नव्हे तर नार्वेकर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचंही सांगण्यात येतंय.
काय घडलं नेमकं पडद्यामागे...
तिकडे विधान भवनात शिवसेनेचे उमेदवार राहुल नार्वेकर विधान परिषद निवडणुकीतून माघार घेऊन परतले होते आणि उद्धव ठाकरेंना त्याचा अतापताही नव्हता... पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह सर्वांनाच अंधारात ठेवून राहुल नार्वेकरांनी उमेदवारी मागे का घेतली? असं कोडं आता शिवसेनेला पडलंय.
असं सांगितलं जातं की, बुधवारी रात्री नार्वेकरांनी मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय समजले जाणारे काँग्रेसचे आमदार संजय दत्त आणि विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांची खासगीत भेट घेतली. त्याचवेळी राष्ट्रवादीचा मुंबईतील एक नेताही नार्वेकरांना भेटला आणि तिथंच गेम फिरला...
गुरूवारी दुपारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपण्याच्या तासभर आधीच नार्वेकरांनी निवडणुकीतून माघार घेतली. परिणामी विधान परिषदेची निवडणूक आता बिनविरोध होणार आहे.
विधान भवनात हे माघारीनाट्य रंगलं असताना, मातोश्रीवर उद्धव ठाकरे रामदास आठवलेंची भेट घेत होते. या भेटीनंतर पत्रकारांनी नार्वेकरांबाबत विचारणा केली, तेव्हा उद्धव यांना त्याबाबत काहीच कल्पना नसल्याचं स्पष्टपणे दिसलं.
युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे राहुल नार्वेकर यांनी शिवसेना नेतृत्वाचा गेम का केला असावा? नार्वेकरांच्या माघारीसाठी पडद्यामागून कुणी सूत्रे हलवली? याबाबत नानाविध तर्क लढवण्यात येत आहेत. यापूर्वीही एकदा राज्यसभा निवडणुकीसाठी राहुल नार्वेकरांनी भरलेला अर्ज मागे घेतला होता. मात्र, यावेळी पक्षप्रमुखांना अंधारात ठेवून त्यांनी हे पाऊल उचलल्यानं त्यांचं पुढचं पाऊल काय असेल? अशी उत्सुकता शिगेला पोहोचलीय.
राहुल नार्वेकर हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपबरोबर शिवसेनेच्या युतीमध्ये आधीच कडवटपणा आलाय. त्यात राहुल नार्वेकरांनी उद्धव ठाकरेंना हा दुसरा धक्का दिलाय. शिवसेनेचे ग्रह सध्या तरी ठिक नाहीत, एवढं नक्की...
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.