www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुण्यात मतदारयाद्यांमधल्या घोळाच्या विरोधात उपोषणाला बसलेले भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी उपोषण मागे घेतलं असलं तरी पुणेकर मात्र फेरमतदानाच्या मागणीसाठी चांगलेच आक्रमक झालेत. मतदानाचा आपला मूलभूत हक्क आपल्याला मिळायलाच हवा, अशी मागणी आता मतदानापासून वंचित राहिलेले नागरिक करत आहेत.
शिरोळे यांनी काल राज्य निवडणूक अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली. यासंदर्भात योग्य तो निर्णय घेण्य़ाचं आश्वासन दिल्यानंतर शिरोळेंनी उपोषण मागे घेतलं. याप्रकरणी शिरोळे हे दिल्लीत जाऊन मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत. पुण्यातल्या मतदार याद्यांमधून नावे गायब करण्यात आल्यानं हजारो पुणेकरांना मतदानापासून वंचित राहावे लागले. या निषेधार्थ पुणेकरांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालून जोरदार घोषणाबाजी करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
महत्वाचं म्हणजे यावेळी मतदानाच्या टक्केवारीत तब्बल १३ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. असं असलं तरी पुण्यातले हजारो मतदार मतदानाचा हक्क बजावू शकले नाहीत. मतदार यादीतून त्यांचं नाव अचानकपणे गायब झाल्याची त्यांची तक्रार आहे. मतदारांची नावं मतदार यादीतून गायब होण्यामागे काँग्रेस राष्ट्रवादीचे षड्यंत्र असल्याचा आरोप भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी केलाय.
दरम्यान, पुण्याच्या मतदान यादीसंदर्भातल्या या घोळाप्रकरणी काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम यांनीही जिल्हाधिका-यांची भेट घेतली. पुण्यात अनेकांना मतदान करता आलं नाही, हे त्यांनी मान्य केलं मात्र काँग्रेसचं यामागे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी फेटाळला.
या पार्श्वभूमीवर मतदानापासून वंचित राहिलेल्यांना लेखी तक्रार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनानं केल्या आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात अशा शेकडो तक्रारी दिवसभरात दाखल झाल्या. असं असलं तरी याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला आहे. त्यामुळे मतदानापासून वंचित राहिलेल्या पुणेकरांना फेरमतदानाची संधी खरोखरच मिळणार का, याबाबत उत्सुकता आहे.
पाहा, पुणेकरांच्या संतप्त प्रतिक्रिया
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.