www.24taas.com , झी मीडिया, वाराणसी
देशाचे पुढील पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदींच्या लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीची ओळख आगामी काळात सर्वात शक्तीशाली शहर म्हणून होणार आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारचा विकास झाला तर ती महाराष्ट्रासाठी खुशखबर असणार आहे. पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मोदी दिल्ली प्रमाणे आपल्या मतदारसंघाला ‘मिनी पीएमओ’ बनवू शकतात. हे मिनी पंतप्रधान कार्यालय वाराणसीसाठी मोदींच्या प्लॅनला मूर्त रूप देऊ शकते.
मोदी वाराणसीची जागा ठेवणार की सोडणार याचा निर्णय अद्याप झालेला नसला तरी आगामी काळात वाराणसीचे महत्त्व वाढणार आहे. मोदी गटातील काही भाजप नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार मोदींची संपूर्ण टीम वाराणसीत असणार आहे. दिल्लीतील पीएम ऑफीस प्रमाणे वाराणसीत मोदी यांचे मिनी ऑफिस असणार आहे.
वाराणसीचे महापौर रामगोपाल मोहले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी काळात काशीमध्ये पीएमओ असणार आहे. मोदींनी वाराणसीसाठी ज्या योजना तयार केल्या आहेत, त्यांची अमंलबजावणी हे कार्यालय करणरा आहे. भाजपच्या गोटातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदींनी या मिनी ऑफिससाठी एक बिल्डिंगही शोधली आहे. सिगरा येथील भाजप कार्यालयाला या साठी निवडण्यात आले आहे. चर्चा अशीही आहे की भाजपने ही बिल्डिंग विकत घेतली आहे.
मोहले यांनी सांगितले की, पक्षाने वाराणसीच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे. त्याला मोदींसमोर ठेवण्यात येईल. मोहले यांनी सांगितले की, शहराच्या स्वच्छतेसाठी एक विस्तृत योजना तयार करण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.