www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कोकणात झालेल्या पराभवानंतर नारायण राणेंनी राजीनामा देऊन मुख्यमंत्र्यांवरचा दबाव वाढवलाय. राजीनामा स्वीकारलेला नसतानाही आजच्या बैठकीला राणेंनी दांडी मारुन हा दबाव आणखी वाढवलाय. त्यातच नारायण राणे यांना राज्याच्या नेतृत्वाची धुरा द्यावी, असा ठराव सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसनं केलाय.
रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये निलेश राणे यांचा झालेला पराभव कोकणात काँग्रेसच्या जिव्हारी लागलाय. या पराभवाचं चिंतन करण्यासाठी काँग्रेसची ओरोसमध्ये बैठक झाली. यावेळी राणेंकडे नेतृत्व देऊन कोकणाला बळकटी द्यावी, असा ठराव झाला. काँग्रेसची ही विस्कटलेली घडी राणे पुर्ववत करू शकतात, तसंच राणेंमुळे राज्याला आक्रमक नेतृत्व मिळू शकतं असा ठराव यावेळी संमत करण्यात आला.यासाठी लवकरच जिल्हा काँग्रेसच्यावतीनं माणिकराव ठाकरेंचीही भेट घेतली जाणार आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकांतल्या पराभवाचं चिंतन करण्यासाठी मुंबईत सुरू झालेल्या सभेला नितीन राऊत आणि नारायण राणे अनुपस्थित राहीले आहेत. काँग्रेसला निवडणुकीत राज्यात सपाटून मार खावा लागलाय. त्याबाबत काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचं चित्र या निमित्तानं पुढं आलं आहे.
नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांना पराभव स्विकारावा लागला. तर नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी विलास मुत्तेमवार यांच्या पराभवाची जबाबदारी घेत राजीनामा देऊ केला होता. राज्यमंत्रिमंडळातले काँग्रेसचे हे दोन नेते या सभेला अनुपस्थित राहिल्यामुळे काँग्रेसमधली नाराजीच यानिमित्ताने समोर आलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.