उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपा-राज ठाकरे मैत्री कळीचा मुद्दा!

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना जाहीर पाठिंबा दिला. एवढंच नव्हे तर मुंबई आणि इतर ठिकाणी भाजप उमेदवारांच्या विरोधात आपले उमेदवारही उभे केले नाहीत.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Apr 27, 2014, 03:32 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, लखनऊ
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना जाहीर पाठिंबा दिला. एवढंच नव्हे तर मुंबई आणि इतर ठिकाणी भाजप उमेदवारांच्या विरोधात आपले उमेदवारही उभे केले नाहीत. यावरच आता उत्तर प्रदेशात राजकारण सुरू झालंय. मनसेचे कार्यकर्ते मुंबई हिंदी भाषकांना मारहाण करीत होते तेव्हा नरेंद्र मोदी कुठे होते,असा सवाल आता सपाकडून प्रचारात केला जात आहे.
हिंदी भाषिकांचा द्वेष करणार्‍या मनसेचा पाठिंबा मिळविण्यासाठी भाजपाच्या नेत्यांनी केलेली धडपड, नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची घेतलेली भेट, गोपीनाथ मुंडे यांनी राज यांचा बीड मतदारसंघात मिळविलेला पाठिंबा यावरून मुख्यमंत्री अखिलेश यादव, उत्तर प्रदेशच्या राजकारणाची नस अन् नस माहिती असलेले त्यांच्या पक्षाचे दिग्गज नेते शिवपालसिंह यादव यांनी भाजपा-मनसे मैत्रीचं भांडवल केलंय.
भाजपा-मनसे संबंधांवर टीकेची झोड उठवूनच सपा थांबलेली नाही तर त्यांनी शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही हिंदी भाषिकांच्या मुद्यावरून लक्ष्य बनविलंय. जपाचा दीर्घ काळापासून मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेनं नेहमीच हिंदी भाषिकांना मुंबईत हिणविलं, अपमानित केलं. भाजपाचे नेते उत्तर प्रदेशात आले की मनसे आणि शिवसेनेबद्दल बोलण्याचं टाळतात. या पक्षांबद्दल महाराष्ट्रात आणि उत्तर प्रदेशात वेगवेगळी भूमिका घेता, असा हल्ला सपानं केला आहे.
शिवपालसिंह यादव आज एका वृत्तपत्राशी बोलतांना सांगितलं की, उत्तर प्रदेश आणि बिहारमधून रेल्वे कर्मचारी भर्तीसाठी मुंबईला गेलेल्या तरुणांना अमानूष मारहाण केली तेव्हा भाजपाचे नेते कुठे होते. सपाचे नेते जाहीर सभांमधून असे आरोप करतात तेव्हा त्यांना टाळ्यांद्वारे प्रतिसाद मिळतो. मोदी फॅक्टरमुळं भाजपाच्या गोटात उत्साह आहे. राज्यात सत्तारुढ असलेल्या सपासमोर मोदी फॅक्टर निष्प्रभ करण्याचं मोठं आव्हान असून तसं करण्यासाठी भाजपा-मनसे, भाजपा-शिवसेना युतीशी हिंदी भाषिकवरील अन्यायाशी जोडून भाजपाविरोधी वातावरण पेटविण्याचा जोरदार प्रयत्न सपानं चालविला आहे.
नरेंद्र मोदी ब्राह्मणविरोधी असल्याची टीका कोणी महाराष्ट्रात केली असती तर या टीकेचा राजकीय फायदा कुठल्याच पक्षाला झाला नसता. तथापि, १७ टक्के ब्राह्मण मतदार असलेल्या उत्तर प्रदेशात त्यांची ही प्रतिमा रंगविली जात आहे. त्यासाठी दलित-ब्राह्मण समीकरणाच्या आधारे लढत असलेल्या बसपानं विशेष पुढाकार घेतला आहे. मोदींच्या गुजरातमध्ये अर्धा डझन ज्येष्ठ शासकीय अधिकार्‍यांना जेलमध्ये पाठविण्यात आले, अहमदाबादमध्ये हरेन पाठक, बिहारमध्ये लालमणी चौबे, वाराणसीत डॉ. मुरली मनोहर जोशी, अलाहाबादमध्ये डॉ. केसरीनाथ त्रिपाठी, कानपूरमध्ये कलराज मिश्रा या ब्राह्मण नेत्यांना अपमानित करण्यात आल्याचे मुद्दे उठवीत बसपाने रान उठविले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.