ठाकरे बंधुंचं वाकयुद्ध राड्यातून रस्त्यावर!

शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि मनसेचे राज ठाकरे यांच्यात कुटुंब कलह सुरू झालाय तर त्यांचा झेंडा खांद्यावर घेणारे शिवसैनिक आणि मनसैनिक एकमेकांना भिडलेत. आपापल्या पक्षाचे झेंडे हातात घेऊन, रस्त्यावर तुफानी राडा करतायत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 3, 2014, 08:21 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि मनसेचे राज ठाकरे यांच्यात कुटुंब कलह सुरू झालाय तर त्यांचा झेंडा खांद्यावर घेणारे शिवसैनिक आणि मनसैनिक एकमेकांना भिडलेत. आपापल्या पक्षाचे झेंडे हातात घेऊन, रस्त्यावर तुफानी राडा करतायत.
ठिकाण : मुंबईतलं ओल्ड कस्टम हाऊस
वेळ : सकाळी १२.०० वाजता
दक्षिण मुंबईतले शिवसेना उमेदवार अरविंद सावंत देखील अर्ज भरण्यासाठी इथं आले. त्यांच्यासोबत हजारो शिवसैनिक होते.  आधीच जमलेले मनसे कार्यकर्ते आणि हे शिवसैनिक समोरासमोर आले आणि दोन्ही बाजूंनी तुंबळ घोषणाबाजी सुरू झाली. आपापल्या पक्षाचे झेंडे फडकवून झिंदाबाद-मुर्दाबादच्या घोषणांनी परीसर दुमदुमून गेला.
 
दुपारी १२.१५
 सावंत अर्ज भरण्यासाठी आत जात असताना दोन्ही बाजूंनी घोषणाबाजीला आणखी जोर आला.
 
दुपारी १२.३०
आदित्य शिरोडकर, शर्मिला ठाकरे आणि नितीन सरदेसाई अर्ज भरण्यासाठी ओल्ड कस्टम हाऊस परिसरात दाखल झाले. ते आत गेल्यानंतर बाहेर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले आणि घोषणाबाजीचं रुपांतर हाणामारीत झालं. झेंड्यांच्या काठ्यांनी मारहाण, दगडफेक, सोडावॉटरच्या बाटल्या फेकणं इथपर्यंत मजल गेली. अखेर जमावाला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमाराचं अस्त्र उगारलं...
 
दुपारी २.००
तास-दीड तास हा राडा सुरू होता. रॅपिड अॅक्शन फोर्स, दंगल नियंत्रण पथक इथं तैनात नव्हतं... होते ते केवळ दंडुकाधारी स्थानिक पोलीस... आता या दंगलीची दृष्यं पाहून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असं अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी म्हटलंय.
शिवसेना आणि मनसेमध्ये आता या राड्यावरून ब्लेमगेम सुरू झालाय. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांची उणीदुणी काढतायत. राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात सुरू झालेलं वाक् युद्ध आता राड्याच्या माध्यमातून रस्त्यावर आलंय. मराठी माणसाचा कैवार घेऊन लढणाऱ्या या नेत्यांच्या भांडणात मराठी माणसाचंच रक्त रस्त्यावर सांडतंय.
पोलिसांची मनसेला साथ - आदित्य ठाकरे
ओल्ड कस्टम हाऊससमोरील राड्याप्रकरणी मनसे उमेदवार आणि पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून केलीय.
`मनसेच्या गुंडांनी दगड आणि सोडा वॉटरच्या बाटल्या फेकल्या... मनसेकडे कसलाही अजेंडा नाही... दक्षिण मुंबईत काँग्रेस उमेदवार जिंकण्याची शक्यता नाही... पोलीस अधिकारी आणि मनसे उमेदवारांवर कारवाई व्हावी... हा राडा पूर्वनियोजित असावा... यामध्ये पोलीस पक्षपातीपणे वागले... निवडणूक आयोगानं याची गंभीर दखल घ्यावी` असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.