www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत झालेल्या राहुल गांधींच्या जाहीर सभेला शरद पवारांनी दांडी मारल्यानं काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत बिघाडी निर्माण झालीय. पवारांनी राहुल गांधींसोबत व्यासपीठावर बसण्याचं टाळून, त्यांच्या नेतृत्वालाच आव्हान दिलंय. तर शरद पवार निवडणुकीनंतर वेगळा सूर तर लावणार नाहीत ना. अशी शंकाही घेतली जातेय.
हे एवढं सगळे प्रश्न निर्माण होण्याचं कारण म्हणजे शरद पवारांनी राहुल गांधींच्या सभेला लावलेली गैरहजेरी. मुंबईतील बीकेसीमध्ये रविवारी झालेल्या आघाडीच्या प्रचारसभेला काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी मार्गदर्शन करणार होत्या. मात्र प्रकृती बिघडल्यानं त्या मुंबईला आल्या नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत राहुल गांधींनी सभा घेतली. मात्र शरद पवारांनी या सभेकडं पाठ फिरवल्यानं आघाडीत बिघाडी निर्माण झाल्याचं बोललं जातंय.
इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली तसंच सोनिया गांधींसोबत काम केलेल्या शरद पवारांना गांधी घराण्यातील तिस-या पिढीचं नेतृत्व स्वीकारणं जड जातंय. एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आणि चार दशकांहून अधिक संसदीय राजकारणाचा अनुभव असलेले शरद पवार, काँग्रेस उपाध्यक्ष आणि तुलनेने नवखे असलेल्या राहुल गांधींआधी भाषणाला उभे राहिल्यास राजकीय प्रोटोकॉलचा प्रश्न कदाचित निर्माण झाला असता.
चारवेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद, केंद्रात संरक्षण आणि कृषिमंत्रीपद भूषवलेल्या पवारांनी साधा खासदार असलेल्या राहुल गांधींचं नेतृत्व का मान्य करावं, असाही सवाल केला जातो. त्यामुळंही पवारांनी सभेला जाणं टाळल्याचं सांगितलं जातंय. शिवाय राहुल यांच्याबद्दल पवारांच्या मनात असलेली अढी लपून राहिलेली नाही. चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा ब्लॉगही पवारांनी लिहिला होता. पवारांचा रोख त्यावेळी राहुल गांधींनाच उद्देशून होता, अशी चर्चा आहे.
त्यामुळं सभेकडे पाठ फिरवून, शरद पवारांनी काँग्रेस नेतृत्वाकडे राहुलबाबतची आपली नाराजी व्यक्त केली का? महाराष्ट्रात केवळ काँग्रेसच्या उमेदवारांचाच प्रचार करणा-या राहुल गांधींना पवारांनी योग्य मेसेज दिलाय का? पवारांचा विरोध नेमका काँग्रेसला आहे की केवळ राहुल गांधींना? उद्या प्रियांका गांधींकडे काँग्रेस नेतृत्व आलं तर शरद पवारांची भूमिका काय असेल? अशी प्रश्नांची जंत्रीच यानिमित्तानं उपस्थित झालीय.
राहुल यांच्याबद्दलचा पवारांचा हा आकस निवडणूक निकालानंतरही कायम राहणार का? आणि वेळप्रसंगी शरद पवार यूपीएशी विसंगत वेगळा सूर आळवणार का? अशी चर्चाही महाराष्ट्रातील निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात सुरू झालीय.
काही प्रश्न
- राहुल गांधींच्या सभेला शरद पवारांची दांडी
- पवारांना मान्य नाहीय का राहुल गांधींचे नेतृत्व?
- पवारांना काँग्रेसला द्यायचाय का वेगळा सिग्नल?
- पवारांचा राहुल गांधींना विरोध की काँग्रेसला?
- निवडणुकीनंतर पवार आळवणार वेगळा सूर?
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.