www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार देण्यामागे भाजपमधील एका गटाचाच सहभाग असून, त्याबद्दलची नाराजी तेथील कार्यकर्त्यांनी भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह; तसेच अन्य नेत्यांपर्यंत पोचवली आहे.
पुण्यातील भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे हे गोपीनाथ मुंडे गटाचे आहेत. या मुंडे समर्थक उमेदवारास त्रास देण्यासाठीच भाजपमधील एका नेत्याच्या मैत्रीपोटी राज ठाकरे यांनी तिथे आपला उमेदवार दिला, असे कार्यकर्त्यांनी राजनाथ सिंह यांना सांगितल्याचे कळते. त्यामुळेच राजनाथ सिंह यांनी पुण्यात राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती, असे कार्यकर्ते सांगत आहेत.
यंदा काँग्रेसतर्फे सुरेश कलमाडी यांना उमेदवारी न मिळाल्याने भाजपला पुण्याच्या विजयाबद्दल खात्री वाटत होती; पण शिवसेनेविरुद्ध तोफा डागणाऱ्या राज ठाकरे यांनी अचानक पुण्यात भाजपविरुद्ध उमेदवार दिल्यामुळे तेथील चित्र बदलत चालले असल्याचे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. नितीन गडकरी यांच्या मैत्रीमुळेच गोपीनाथ मुंडे गटाला शह देण्यासाठीच मनसेने ही खेळी केली असल्याचे बोलले जात आहे.
पुण्यात मनसेने उमेदवार देऊ नये, यासाठी राज ठाकरे यांचे गडकरी यांनी मन का वळवले नाही, असा कार्यकर्त्यांचा सवाल आहे. तिथे काँग्रेसचे विश्वकजित कदम विजयी झाल्यास भाजपमधील वाद उफाळून आल्याशिवाय राहणार नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.