www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
दिल्लीत यशस्वीरीत्या निवडणुका जिंकल्या असल्या तरी आता लोकसभा निवडणुकीपूर्वीच उमेदवारीवरून आपमध्ये बेबनाव सुरू झालाय. नाराज झालेल्या `आम आदमी पार्टी`च्या काही सदस्यांनी थेट `नागपूर आम आदमी पक्ष` या नव्या पक्षाचीच स्थापना केलीय.
नागपुरात `आप`नं अंजली दमानिया यांना उमेदवारी दिल्यामुळं स्थानिक इच्छुक नाराज झाले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या रुपाताई कुलकर्णींपाठोपाठ आता `आप`चे सदस्य असलेले मोहन कारेमोरे यांनीही दमानियांवर आगपाखड करत थेट बंडाचे निशाण फडकावत `नागपूर आम आदमी पक्षाची` स्थापना केलीय.
नव्या पार्टीचे संयोजक मोहन कारेमोरे स्वतः एक महिती अधिकार कार्यकर्ते आहेत. त्यांच्यासोबत मनोहर माळवे, दिनेश कोल्हे, रोहित भुरे, नितीन शर्मा दिगंबर तामडी, आणि अन्य सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. दमानिया यांच्या पतीच्या विरोधात आपल्याकडे भ्रष्टाचाराचे पुरावे असून आपण लवकरच ते बाहेर काढू, असा इशाराही कोरमारे यांनी दिला आहे.
लोकसभेची उमेदवारी हवी असेल तर मतदारसंघातून स्थानिक नागरिकांच्या सह्यांची शिफारसीची अट आपनं घातली होती. या अटीमुळं योग्य आणि स्थानिक प्रश्नांची जाण असलेल्या उमेदवाराला तिकीट मिळणार, अशी आशा `आप`च्या कार्यकर्त्यांना होती. या पारदर्शक प्रक्रियेचं सर्वच स्तरांवरून स्वागतही झालं. मात्र, अंजली दमानियांना नागपुरातून उमेदवारी जाहीर झाली आणि `आप`चा उमेदवारी देण्याचा अर्ज आणि शिफारशींचा फार्स सर्वांसमोर आला. इतर प्रमुख पक्षांप्रमाणेच स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता दिल्लीहून उमेदवार लादला जातो, तशीच अवस्था आपमध्ये दिसून आलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.