www.24taas.com, झी मीडिया, जळगाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता वाराणसीचेच खासदार राहणार आहेत. त्यांनी गुजरातच्या बडोद्याची जागी सोडलीय. मोदी वाराणसी आणि बडोदा दोन्ही मतदारसंघातून विजयी झाले होते. आता पुढील पाच वर्षे लोकसभेत ते वाराणसीचं प्रतिनिधित्व करणार आहेत.
दरम्यान, बडोदा मतदारसंघातून मोदींचा हात समजले जाणारे अमीत शहा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी यांनी बडोद्यातून काँग्रेसचे उमेदवार मधुसूदन मिस्त्री यांचा ५ लाख ७० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता.
तर, वाराणसीत आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवाल यांचा ३ लाख ७२ हजारांहून अधिक मतांच्या फरकानं धुव्वा उडवला होता. दोन्ही जागांवरून प्रचंड मताधिक्यानं निवडून आलेले नरेंद्र मोदी कोणती जागा सोडणार याविषयी उत्सुकता होती. ती उत्सुकता अखेर शमली आहे.
मोदी यांनी वाराणसीचे प्रतिनिधित्व करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदींच्या या निर्णयामागं भाजपचं `मिशन -२०१७` असल्याचं बोललं जातंय. २०१७ मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून यूपीची सत्ता ताब्यात घेण्याची भाजपची रणनीती असल्याचं सांगितलं जातंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.