www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
2014च्या निवडणुका झाल्यायत आणि आता लक्ष लागून राहिलंय ते १६ मेकडे... कुणाचं सरकार येणार, दिल्लीचं तख्त कुणाचं याचा फैसला शुक्रवारी होणार आहे. पण सगळ्या एक्झिट पोलचे आकडे एनडीएच्या बाजूनं झुकलेले आहेत. एकंदरीतच देशाचा मूड पाहता अब की बार मोदी सरकार.... हे सध्याच्या घडीला तरी खरं वाटतंय.
मोदींचं सरकार आलंच तर त्यांचं ड्रीम कॅबिनेट कसं असेल. मोदींच्या ड्रीम कॅबिनेटमध्ये कुणाची वर्णी लागणार. कुणाला मंत्रिपदाची संधी मिळणार, महाराष्ट्रातून कुणाचा नंबर लागणार आणि कुणाला कुठलं खातं मिळणार.
अरुण जेटली
मोदींच्या `ड्रीम कॅबिनेट`मधला महत्त्वाचा चेहरा आहे अरुण जेटली. जेटली गेल्या अनेक वर्षांपासून मोदींचे निकटवर्तीय समजले जातात. गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये जेटलींनी वेळोवेळी मोदींना मदत केलीय. जेटलींची एकंदरीत कारकीर्द लक्षात घेता अरुण जेटलींना अर्थमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे.
राजनाथ सिंह
झी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार राजनाथ सिंह मोदींच्या `ड्रीम कॅबिनेट` चे महत्त्वाचे सदस्य असतील आणि त्यांना संरक्षण मंत्रालय मिळण्याची शक्यता आहे.
सुषमा स्वराज
मोदींच्या ड्रीम कॅबिनेटमधला आणखी एक महत्त्वाचा चेहरा म्हणजे... सुषमा स्वराज यांच्याकडे सरकार चालवण्याचा आणि विरोधी पक्षनेत्या म्हणूनही मोठा अनुभव आहे. त्यामुळे सुषमा स्वराज यांच्यावर परराष्ट्र मंत्रीपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते.
मनोहर पर्रिकर
गृहमंत्रालयाची जबाबदारी ही महत्त्वाची जबाबदारी समजली जाते. ज्याच्यावर संपूर्ण विश्वास आहे, अशा व्यक्तीवरच गृहखात्याची जबाबदारी पंतप्रधान सोपवतात. त्यामुळंच या पदासाठी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर दावेदार समजले जातायत.
या चार दिग्गज नेत्यांशिवाय मुरली मनोहर जोशी, नितिन गडकरी, वेंकैया नायडू, अनंत कुमार, रविशंकर प्रसाद, राजीव प्रताप रुडी, शाहनवाज हुसैन, यशवंत सिन्हा ही सुद्धा भाजपमधली आणखी काही दिग्गज नावं. या सगळ्यांनाही महत्त्वाची जबाबदारी मिळावी, अशी मोदींची इच्छा असणार.
> मुरली मनोहर जोशींना स्पीकर करण्यात येईल, असा अंदाज आहे.
> नितिन गडकरी परिवहन मंत्री होण्याची शक्यता आहे.
> व्यंकय्या नायडूंना कृषिमंत्र्याची जबाबदारी मिळण्याचा अंदाज आहे.
> अनंत कुमार यांच्यावर संसदीय कामकाजमंत्र्यांची जबाबदारी येऊ शकते.
> या नेत्यांशिवाय रविशंकर प्रसाद कायदा मंत्री
> राजीव प्रताप रुडी हवाई वाहतूक मंत्री
> शाहनवाज हुसैन यांना अल्पसंख्याक मंत्रालय आणि
> यशवंत सिन्हा यांना नियोजन आयोगाचा उपाध्यक्ष केलं जाण्याची शक्यता आहे.
मोदींच्या या ड्रीम कॅबिनेटमध्ये एनडीएचे घटक लोकजनशक्ती पार्टी, प्रकाश सिंह बादलांचं अकाली दल आणि शिवसेनेसह अनेक छोटे पक्ष सहभागी आहेत आणि या सगळ्यांनाही पूरेपूर न्याय द्यावा लागणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.