राज ठाकरेंच्या शहरी भागात सभांचा धडाका

महाराष्ट्र नवनिर्माण सेनचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली प्रचारसभा गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर म्हणजेच ३१ मार्चला पुण्यात होत आहे. या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. मनसेने शहरी भागात लोकसभेचे उमेदवार दिलेत. त्यामुळे शहरांमध्ये राज ठाकरे यांनी लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. यामुळे शिवसेनेला डोकेदुखी होण्याचे संकेत आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 28, 2014, 01:11 PM IST

www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली प्रचारसभा गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर म्हणजेच ३१ मार्चला पुण्यात होत आहे. या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. मनसेने शहरी भागात लोकसभेचे उमेदवार दिलेत. त्यामुळे शहरांमध्ये राज ठाकरे यांनी लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. यामुळे शिवसेनेला डोकेदुखी होण्याचे संकेत आहेत.
राज यांच्या प्रचारसभा प्रामुख्याने शहरी भागांतच होत असल्याने सेनेला फटका बसेल अशी चर्चा आहे. मनसेने अन्य मतदारसंघांत निवडणूक लढविण्याबाबतची भूमिका गुलदस्तात ठेवल्याने या ठिकाणच्या मनसे कार्यकर्ते संभ्रमनात आहेत. दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकर, दक्षिण-मध्य मुंबई आदित्य शिरोडकर, उत्तर-पश्‍चिममधून महेश मांजरेकर, कल्याण राजू पाटील, नाशिक डॉ. प्रदीप पवार, पुणे दीपक पायगुडे, ठाणे अभिजित पानसे, भिवंडी सुरेश म्हात्रे आणि शिरूरमधून अशोक खांडेभराड, वाशीम-यवतमाळ येथून राजू पाटील-राजे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. पुणे वगळता जवळपास सर्व उमेदवार हे शिवसेने विरोधात आहेत.
मुंबईत शिवसेनेचे अरविंद सावंत, गजानन कीर्तिकर, राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे, हेमंत गोडसे, शिवाजीराव आढळराव पाटील आणि मनसेचे उमेदवार आमने-सामने असल्याचे सध्याचे चित्र आहे. मावळमधील शेकापच्या लक्ष्मण जगताप आणि रायगडमधील रमेश कदम यांना मनसेने जाहीर पाठिंबा दिल्याने श्रीरंग बारणे आणि विद्यमान खासदार अनंत गिते यांच्यासमोर अडचणी वाढल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका पुण्यातून होणार आहे. याठिकाणी भाजपचा उमेदवार आहे. मात्र, अन्य भाजप उमेदवाराविरोधात मनसेचा उमेदवार नाही. पुण्यानंतर मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, राजगुरुनगर, नाशिक या ठिकाणी राज यांच्या सभा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
पुण्यातील पहिल्याच सभेनंतर मनसेची भूमिका समोर येणार आहे. मात्र राज यांच्या सभा शहरी भागात होणार असल्याने मनसेचा फटका शिवसेनेला बसणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. मात्र, पुण्यातील सभेत राज ठाकरे अन्य मतदारसंघांबाबत भूमिका जाहीर करतील, अशी अपेक्षा आहे. तसेच कार्यकर्त्यांनी काय करावे, याबाबत राज बोलतील अशी शक्यता आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.