www.24taas.com, पुणे
दिर्घकाळ लांबलेली मिरवणूक हेच यावर्षीच्या पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं मुख्य वैशिष्ट्यं ठरलं. तब्बल २८ तासानंतर या मिरवणुकीला पूर्णविराम मिळालाय.
पोलिसांनी रात्री बारानंतर पारंपारिक वाद्य वाजवण्यास परवानगी देऊनही पुण्याची विसर्जन मिरवणूक तब्बल २८ तास ५० मिनिटे चालली. आज दुपारी ३ वाजून २२ मिनिटांनी मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडली. मानाच्या पहिल्या गणपतीच्या विसर्जनालाच सुमारे दीड तास उशीर झाला. त्यामुळे, मानाच्या इतर गणपतींचे विसर्जन देखील लांबले. दरवर्षी साधारण पाचच्या सुमारास मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक संपते मात्र यावेळी यासाठी साडे सात वाजले. मानाच्या पाचव्या केसरी वाडा गणपतीचे ७ वाजून २० मिनिटांनी विसर्जन झाले.
सकाळी ७ वाजून दहा मिनिटांनी दगडूशेठ गणपतीची मिरवणूक अलका टॉकीज चौकात दाखल झाली. त्यानंतर साडे सात वाजता दगडूशेठ विसर्जनासाठी रवाना झाला. दुपारी एक वाजता महाराष्ट्र तरुण मंडळ हे शेवटचे मंडळ लक्ष्मी रस्त्यावरून विसर्जनासाठी रवाना झाले. त्यानंतर कुमठेकर रस्ता आणि टिळक रस्त्यावरील मंडळा बाकी होती.