श्रीनिवासन यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादीचं 'फिक्सिंग'

‘बीसीसीआय’चे अध्यक्ष श्रीनिवासन यांना आयपीएलमधील मॅच फिक्सिंग प्रकरण भोवणार असल्याचं दिसतंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 24, 2013, 06:49 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘बीसीसीआय’चे अध्यक्ष श्रीनिवासन यांना आयपीएलमधील मॅच फिक्सिंग प्रकरण भोवणार असल्याचं दिसतंय.
श्रीनिवास यांना राजीनामा द्यावा लागणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे आणि आता तर भारतीय क्रिकेटमध्ये दबदबाब असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीनंही त्यांचा राजीनामा मागितलाय. त्यामुळं श्रीनिवासन यांची अध्यक्षपदावरून उचबांगडी होणार असल्याचं निश्चित मानण्यात येतंय.
श्रीनिवासन हे आयपीएलची फ्रॅन्चायजी असलेल्या चेन्नई सुपर किंगचे मालकही आहेत. विशेष म्हणजे चेन्नईच्या टीमचा सीईओ आणि मॅच फिक्सिंग प्रकरणात अडकलेला गुरूनाथ मय्यपन हा त्यांचा जावई आहे. त्यामुळं जावयाचा कारनामा सासऱ्याला महागात पडणार असल्याचं दिसतंय. आयपीएलमुळं बीसीसीआयदेखील बदनाम होत असल्याचं बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं नैतिकतेच्या आधारावर श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी आता वाढू लागलीय.

तसंच ‘बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनी केलीय. पक्षाचे प्रवक्ते डी.पी.त्रिपाठी यांनी ही मागणी केलीय. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात संशयाची सुई श्रीनिवासन यांचा जावई मय्यपन यांच्याकडे आहे. त्यामुळं नैतिकतेच्या आधारावर एन. श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा, असं त्रिपाठी यांनी म्हटलंय. ‘मॅच फिक्सिंग ही आजची गोष्ट नाही, या प्रकरणी कायद्यात बदल होणं आवश्यक आहे. या प्रकरणातल्या दोषींना १० वर्षांची शिक्षा करावी, तसंच त्यांची संपत्तीही जप्त करण्यात यावी’ अशी मागणीही त्यांनी केलीय. शरद पवार अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनंही श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी करणं या गोष्टीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच आता कोणत्याही क्षणी श्रीनिवासन यांची ‘विकेट’ पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.