Www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कोवळ्या वयातल्या मुलांनी खेळावं, बागडावं, शाळेत शिकावं... पण सगळ्यांच्याच नशिबात ते नसतं... काही कळ्या फुलण्याआधीच खुरडल्या जातात... आज `झी 24 तास करणार आहे असाच एक मोठा पर्दाफाश... मोठे मासे छोट्या छोट्या माशांचं कसं शोषण करतायत... हे लोकांच्या समोर आणण्याचा हा एक प्रयत्न... `ऑपरेशन ससून डॉक`...
कुलाब्याचं ससून डॉक... समुद्रातून बोटीतून पकडून आणलेले मासे याठिकाणी लिलावाने खरेदी-विक्री केले जातात. त्यानंतर हे मासे नेले जातात जवळपासच्या 40 गोडाऊनमध्ये... ते साफ करण्यासाठी... धक्कादायक बाब म्हणजे या गोडाऊन्समध्ये मोठ्या प्रमाणावर बाल कामगार काम करतायत... या चिमुकल्यांकडून दिवसभर मासे साफ करुन घेतले जातात. ही वस्तुस्थिती जेव्हा `झी मीडिया`ला समजली, तेव्हा झी मीडियाची टीम ससून डॉकयार्डमध्ये जाऊन पोहचली. शहानिशा करण्यासाठी...
यावेळी, आमच्या छुप्या कॅमेऱ्याने इथली अंगावर काटा आणणारी सर्व दृश्यं आम्ही टिपलीत... 4 ते 18 वर्षापर्यंतची शेकडो मुलं याठिकाणी मासे साफ करण्याचं घाणेरडं काम दिवसभर करतात. सकाळी 6 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे काम चालतं. दिवसभर या घाणीत काम केल्यानंतर, हातात पडते जेमतेम 100 रूपयांची मजुरी... काहींना वर्षभराचे फक्त 10 हजार रुपये त्यासाठी दिले जातात. यापैंकी बहुसंख्य मुलं शाळेतही जात नाहीत. दिवसभर मासे साफ करुन या मुलांचे हात सोलून निघतात. माशांचे काटे लागल्याने हातातून रक्तदेखील येतं. खेदाची बाब म्हणजे त्यांचे आई-वडिल आणि नातेवाईकच या मुलांना या कामात जुंपतात. यातील अनेक मुलं ही कर्नाटक राज्यातील असून विविध कारणांनी त्यांना याठिकाणी आणलं जातं आणि त्यांच्याकडून हे काम करुन घेतलं जातं.
प्रथम या स्वयंसेवी संस्थेने ही बाब उघडकीस आणलीय. गेल्या दोन वर्षांपासून प्रथम त्यावर काम करतेय. संस्थेने डिसेंबर 2011मध्ये केलेल्या सर्वेनुसार याठिकाणी, एकूण 652 मुलं काम करतायत. त्यामध्ये 175 मुले आणि 477 मुलींचा समावेश आहे. यातील केवळ 108 मुलंच शाळेत जात असून शाळेत न जाणाऱ्या मुलांची संख्या 544 इतकी आहे, अशी माहिती `प्रथम` या संस्थेच्या कार्यक्रम प्रमुख नवनाथ कांबळे यांनी दिलीय.
याबाबत बाल हक्क विभागाकडे वारंवार तक्रार करुनही कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याचा आरोप प्रथमने केलाय. प्रथमनं याविरोधात बाल हक्क आयोगाकडे तक्रार केली. या सुनावणी दरम्यान बाल हक्क आयोगानं सरकारच्या कामगार विभागावर तसंच पोलिसांवर ताशेरे ओढले असून आयपीसी कलम 306 1,2,3 नुसार याठिकाणी छापा टाकून कारवाई करण्याचे आदेश दिलेत. शिवाय, या प्रकरणी कामगार मंत्री आणि महिला व बालकल्याण विभाग झोपा काढतायत का? असाही सवाल उपस्थित होतो.
अशा पद्धतीनं बालकांकडून काम करवून घेणं कायद्याने तर गुन्हाच आहेच पण ज्या वयात या चिमुकल्याने शाळेत जायला हवं खेळायला हवं बागडायला हवं त्या वयात या देवाघरच्या फुलांना सुगंधीचा नव्हे तर दुर्गंधीचा दिवस रात्र सामना करावा लागतोय. त्यामुळे हा प्रकार माणुसकीला काळीमा फासणारा आहे, असंच म्हणावं लागेल.
व्हिडिओ पाहा -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.