रांझणा: धनुषचा तीर प्रेक्षकांच्या काळजात!

या आठवड्यात रिलीज झालेल्या ‘रांझणा’ सिनेमातून प्रेमाचा एक वेगळा रंग आपल्या समोर येतो. सोनम कपूर आणि धनुष यांच्या ‘रांझणा’मध्ये खूप इंटरेस्टिंग भूमिका आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 21, 2013, 03:21 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
या आठवड्यात रिलीज झालेल्या ‘रांझणा’ सिनेमातून प्रेमाचा एक वेगळा रंग आपल्या समोर येतो. सोनम कपूर आणि धनुष यांच्या ‘रांझणा’मध्ये खूप इंटरेस्टिंग भूमिका आहे.
कथा
कुंदन (धनुष) हा बनारसमध्ये राहणारा मुलगा. जेव्हा बनारसच्या मार्केटमध्ये झोया (सोनम कपूर)ला बघतो त्याचवेळी त्याला ती आवडते. तिला बघण्यासाठी तो रोज तिचा पाठलाग करत असतो. तो झोयाला त्याच्या प्रेमाबद्दलही सांगतो. सुरूवातीला झोया त्याच्या या प्रेमाला नकार देते, मात्र तरीही कुंदनचे तिच्याबद्दलचे प्रेम काही कमी होत नाही. या दोघांमधील हे संबध पुढे चालू न राहण्यासाठी झोयाचे आईवडिल तिला शिक्षणासाठी दिल्लीला पाठवतात.
पुढे झोया उच्च शिक्षणासाठी दिल्लीला निघून जाते आणि कुंदन मात्र बनारसमध्येच राहतो. दिल्लीला तिची भेट होते अक्रम(अभय देओल) याच्याशी. झोया आणि अक्रम एकाच कॉलेजमध्ये शिकत असतात. त्यातून ओळख होऊन त्या दोघांचे प्रेम होते. ८ वर्षानी झोया पुन्हा आपल्या गावी म्हणजेच बनारसला येते. त्यावेळी कुंदन (धनुष) याला प्रचंड आनंद होतो. तो झोयाला पुन्हा एकदा आपल्या प्रेमाविषयी विचारणार त्याआधीच झोया त्याला तिच्या आणि अक्रमच्या प्रेमाविषयी सांगते. कुंदन मात्र ऐकून फार निराश होतो. आणि यानंतरच सुरुवात होते ती रांझनाच्या ख-या गोष्टीला. यात हे तिघे जरी एकाच भावनेने गुंतलेले असले तरी यात प्रेमाचा त्रिकोण नाही.
दिग्दर्शन
या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत आनंद एल रॉय ज्यांनी अतिशय भावनात्मक पद्धतीने हा प्रेमाचा विषय मांडलाय. यातील दिग्दर्शकाने खूपच सुंदर पद्धतीने या चित्रपटाचे चित्रण केले आहे ज्यामुळे प्रेक्षक शेवटपर्यंत खिळून राहतात. यातील सर्व भूमिका दिग्दर्शकाने फारच सुंदर पद्धतीने उभ्या केल्या आहेत. प्रेक्षकांवर छाप पाडणारे यातील संवादही उत्तम आहेत
संगीत
या चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे ए आर रेहमान यांच संगीत. त्यानी संगीतबद्ध केलेली गाणी प्रेक्षकांना खरचं आवडतील. ‘पिया मिलेंगे’, ‘तुम तक’ ही गाणी आधीच हिट ठरली आहेत. बनारसची एक पावन संस्कृती असल्याने त्यात रंगासोबत संगिताचाही वाटा महत्वाचा ठरतो. याला रेहमानच्या संगिताने पूर्ण न्याय दिला आहे.
अभिनय
धनुषने आपल्या पहिल्याच हिंदी सिनेमात बाजी मारली आहे. पारंपरिक अभिनेत्यांच्या पठडीतलं त्याचं व्यक्तिमत्व नसलं, तरीही त्याचा अभिनय लोकांना आवडून जातो. सोनम कपूरनेही धनुषला चांगली साथ दिली आहे. सोनम कपूर आणि धनुष यांचा निरागसपणा प्रेक्षकांना भावून जातो. अभय देओल यानेही त्याच्या भूमिकेला पूर्णपणे न्याय दिलाय.
का बघावा हा चित्रपट?
हा चित्रपट जरी पूर्णपणे प्रेमकथेवर आधारित नसला तरी एक हटके असा हा चित्रपट आहे. एक मनाला भावणारा सुंदर चित्रपट बघण्यास वेगळे कारण शोधण्याची गरज नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.