www.24taas.com, विशाल करोळे, झी मीडीया, औरंगाबाद
औरंगाबादच्या कायगाव टोक्यावर असलेल्या गोदावरी पात्रात धोकादायक पद्धतीने मासेमारी सुरू आहे. नदीच्या पाण्यात वीजेच्या तारा टाकून इथे मासेमारी केली जातेय. झी 24 तासच्या कॅमे-यात हा भयानक प्रकार उघड झालाय. यामुळे पर्यावरणाचं नुकसान होतंच आहे. पण नदीच्या पात्रालगत मानवी जिवितालाही धोका निर्माण झालाय.
कायगाव टोक्यावर असलेल्या गोदावरी नदीच्या घाटावरून थेट पाण्यात सोडलेली ही वीजेची वायर पाहा... थेट पाण्यात विजेची वायर कशासाठी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याचं उत्तर आहे मासेमारी... नदीच्या पाण्यात वीजेचा प्रवाह सोडून माशांना शॉक देण्यात येतोय. त्यामुळे मासे मरतात आणि मासेमारी सोपी होते असा हा प्रकार सुरू आहे.
या प्रकारच्या मासेमारीला परवानगी नाही. गोदावरी नदीपात्रातून शेतीला पाणी पुरवठा केला जातो. त्यासाठी हजारो मोटारी 24 तास सुरू असतात. त्यालाच आकडा टाकून तार वापरत हा वीजप्रवाह पाण्यात सोडला जातोय. पाण्यात एका जाळीच्या सहाय्याने माशांना शॉक दिला जातो. त्यात मेलेले मासे पाण्यावर तरंगायला लागतात. त्यांना विक्रीसाठी नेलं जातं.
मासेमारीचा परवाना नसताना अशा पद्धतीने मासेमारी करणारे थोडे थोडे मासे घेऊन पळ काढत आहेत. या प्रकारामुळे पाण्यातल्या सर्वच जलचरांना धोका निर्माण झालाय. त्याचबरोबर परिसरात पाण्यात उतरणं माणसांनाही धोकादायक झालंय. इतका मोठा प्रकार सुरू असताना प्रशासनाचं मात्र इथे लक्ष गेलेलं नाही त्याबाबत आश्चर्य व्यक्त होतंय
हा धक्कादायक प्रकार दाखवून दिल्यावर वीज वितरण कंपनीचे अधिकारी हादरलेत. अशा प्रकारांवर कारवाईचं आश्वासन त्यांनी दिलंय. हा प्रकार पहिल्यांदाच पाहील्याचा दावा कंपनीच्या अधिका-यांनी केला असला तरी असे प्रकार या भागात सर्रास सुरू असल्याचं बोललं जातंय.
पाहा हा धक्कादायक व्हिडिओ
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.