एकतर्फी प्रेमातून तरुणीसह कुटुंबीयांवर हल्ला

तरुणीवर हल्ला करताना एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने तरुणीसह तिची आई, बहिण, भावजय यांच्यावरही प्राणघातक हल्ला केला. तरुणीच्या कुटुंबावर हल्ला केल्यानंतर या तरुणाने स्वतःलाही संपवून घेण्याचा प्रयत्न केला.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 19, 2014, 08:21 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील उन्हाळे गावात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला करण्याचा खळबळ जनक प्रकार घडलाय. विशेष म्हणजे, या तरुणीवर हल्ला करताना एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने तरुणीसह तिची आई, बहिण, भावजय यांच्यावरही प्राणघातक हल्ला केला. तरुणीच्या कुटुंबावर हल्ला केल्यानंतर या तरुणाने स्वतःलाही संपवून घेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी राजापूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आलाय.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील उन्हाळे गावात ही खळबळ जनक घटना घडली. याच गावाच्या जवळ राहणारा राकेश सोड्ये यानं एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला केलाय. उन्हाळे गावाजवळ राहणारा राकेश गावातील लोगगे कुटुंबाला गेल्या दोन वर्षांपासून ओळखत होता. लोलगे कुटुंबातील प्रियांका हिच्याशी त्याची मैत्री होती. काही दिवसांपूर्वी प्रियांकाचे गावाजवळील मुलाशी लग्न ठरले. हे समजल्यानंतर माझ्याशी लग्न कर... असा तगादा राकेश यानं प्रियांकामागे लावला होता. मात्र, प्रियांका आपल्याला भीक घालत नाही हे लक्षात आल्यानंतर राकेशनं थेट लोगले यांचं घर गाठलं.
रागाच्या भरात राकेश यानं आपल्याशीच लग्न करायचं, अशी धमकी प्रियाकाला दिली. तीनं ती स्पष्टपणे धुडकावून लावली. त्यामुळे हातात धारधार शस्त्र घेवून आलेल्या राकेशने प्रियांकाच्या हातावर आणि अंगावर सपासप वार केले. त्याच वेळी राकेशला प्रतिकार करण्यासाठी प्रियांकाची आई प्रभावती आडवी आली. तिच्यावरही राकेशने वार केले. त्यानंतर घरात असलेल्या प्रियांकाच्या बहिण आणि भावजयीवरसुद्धा राकेशने वार केले.
त्यानंतर राकेशने स्वतःच्या पोटात धारधार हत्यार घुसवत स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर गावातल्या मंडळीनी सर्वांना पहिल्यांदा राजापूर आणि त्यानंतर रत्नागिरीतल्या रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी प्रियांकाने राजापूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केलीय, अशी माहिती डीवायएसपी अशोक बनकर यांनी दिलीय.
राजापूर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेले हत्यार जप्त करण्यात आलंय. दरम्यान, स्वतःवर हल्ला करणाऱ्या राकेशला अधिक उपचारासाठी कोल्हापुरात हलवण्यात आलंय. प्रियाकांची बहिण आणि भावजय यांना उपचार करुन सोडून देण्यात आलंय. मात्र, एकतर्फी प्रेमातून झालेल्या या प्रकाराने रत्नागिरीत खळबळ माजली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.