औरंगजेब : उत्कृष्ट अभिनय, पटकथा पण हरवला सूर!

औरंगजेब या सिनेमाची कथा हरियाणाच्या गुरगावातल्या लँड माफिया आणि पोलिसांच्या अवतीभवती फिरते.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 17, 2013, 07:12 PM IST


सिनेमा – औरंगजेब
दिग्दर्शक – अतुल सबरवाल
कलाकार – ऋषी कपूर, अर्जुन कपूर, जॅकी श्रॉफ, साशा

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
औरंगजेब या सिनेमाची कथा हरियाणाच्या गुरगावातल्या लँड माफिया आणि पोलिसांच्या अवतीभवती फिरते. जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात आपलं साम्राज्य उभं करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन कुटुंबांमद्ये सुरू असलेलं युद्ध या चित्रपटात चित्रीत करण्यात आलंय. यातील पहिलं कुटुंब आहे – पोलीस अधिकारी विकांत म्हणजेच ऋषी कपूरचं...
‘औरंगजेब’ सिनेमाची कथा गुरगावातील एका छोट्या खेड्यांमध्ये लँड माफियांच्या वाढत्या प्रभावावर आधारित आहे. सिनेमात यशवर्धन (जॅकी श्रॉफ) एक रिअल इस्टेट डेव्हलपर आहे. त्याच्या ग्रुपमधील अजय म्हणजेच अर्जुन कपूर हा त्याचा एक प्यादा... पण अतिशय धूर्त.... कोणताही गुन्हा किंवा बेकायदेशीर काम केल्यानंतर कोणताही सुगावा न सोडणारा... पोलीस या महाभागाला पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. पण यश काही त्यांच्या हाती लागत नाही. आणि कथा पुढे सरकते. लँड माफिया, सूडबुद्धी, कट-कारस्थानं आणि रक्तलांछित कारनामे, अशा रितीनं सिनेमाचा प्रवास पुढे सुरू राहतो.
सिनेमातील कलाकारांबद्दल बोलायचं म्हटलं, तर ऋषी कपूरनं सिनेमात भलताच भाव खाल्लाय. सिनेमातल्या प्रत्येत सीनमध्ये ऋषीच्या अभिनयाची छाप स्पष्टपणे दिसते. वाढत्या वयाचा परिणाम त्यावर दिसणं अशक्य आहे असं वाटतं आणि अभिनयात तर तो पहिल्यापासून तरबेज आहे.
अर्जुन कपूरला या सिनेमात डबल रोल करण्याची संधी मिळालीय. त्यानं आपल्या भूमिका चपखल बसलाय. सिनेमा प्रदर्शित होण्याअगोदरच अर्जुन आणि साशाच्या ‘इंटिमेट’ सीन्समुळे सिनेमाची चर्चा जोरावर होती. पण, सिनेमातील इंटीमेट सीन्स मात्र थंड वाटतात. दोघांनी केमिस्ट्रीमध्ये फारकत घेतल्याचं दिसतं. अनेकदा प्रेक्षकांना हे सीन्स जाणून-बुजून सिनेमामध्ये घुसडल्याचं वाटत राहतं. जॅकी श्रॉफनं मात्र आपली भूमिकेमध्ये जान आणलीय.

लँड माफिया आणि त्यांचा वाढत चाललेला प्रभाव मात्र सिनेमाच्या कथानकातून चांगल्या पद्धतीनं उलगडतो. पण, सिनेमातील अनेक सीन इकडे-तिकड़े झालेले वाटतात. सिनेमाची पटकथा प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होते. पण एक गोष्ट प्रेक्षकांना खटकत राहते, अर्जुनच्या भूमिकेला आणखी थोडा वाव द्यायला हवा होता असं वाटतं. सिनेमातील संगीतही ठिक-ठाक म्हणता येईल. तुम्ही हा सिनेमा एकदातरी नक्कीच बघू शकता.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.