विकास मिश्रा, www.24taas.com, मुंबई
लैला खान उर्फ रेश्मा पटेल.... लैला खान जिचे दिल्ली बॉम्बस्फोटाशी धागेदोरे असल्याची चर्चा झाली... तीच लैला जिला पाकिस्तानी ठरवलं गेलं... पण झी 24 तासनं जेव्हा चौकशी केली तेव्हा खळबळजनक माहिती पुढे आली.
लैलाचा जन्म मुंबईच्या गोळीबार भागात झाला. लैलाचे पहिले वडील नादिर पटेल त्यांची पहिली पत्नी सरिनासह गोळीबार भागात राहत होते. झी 24 तासच्या हाती जी रेशन कार्डची प्रत लागलीय तिच्यात लैलाचं खरं नाव रेश्मा असं नमूद केलंय. पुढे नादीर खान यांच्याकडे पैसा आला तेव्हा त्यांनी मुंबईतल्या ओशिवरा या पॉश भागात सनशाईन अपार्टमेंटमध्ये घर घेतलं. लैलाला त्यांनी शिक्षणासाठी पाचगणीच्या स्कॉलर्स अँकेडमीत पाठवलं. लैलानं पाचगणीतच तिचं ग्रज्युएशन पूर्ण केलं.
1990 मध्ये लैलाचे वडील नादिर यांनी दुसरं लग्न केल्यानंतर लैला तिच्या आईसह वेगळी राहू लागली. 2005 मध्ये तिनं बॉलीवूडमध्ये नशिब आजमावायला सुरुवात केली. 2008 मध्ये राकेश सावंत यांच्या वफा सिनेमात राजेश खन्नांसोबत काम करण्याची संधी मिळाली. बॉलीवूडमध्ये मोठी अभिनेत्री बनण्याचं तिचं स्वप्न होतं
जानेवारी 2011 मध्ये ती कुटुंबीयांसह रहस्यमयरित्या गायब झाली. लैलाच्या वडिलांनी झी 24 तासला दिलेल्या माहितीवरून ती पाकिस्तानी नागरिक नव्हती एवढं मात्र स्पष्ट झालंय.