'म्हाडा'ला दलालांचा गराडा

मुंबईत म्हाडाची स्वस्त घऱांसाठीची लॉटरी 31 मेला जाहीर होणार आहे. मात्र, दलालांनी आत्तापासूनच वेगवेगळे फंडे वापरायला सुरूवात केली आहे. गेल्यावर्षी बिल्डरांनी बनावट अर्ज दाखल केल्याचं उघड झालं होतं. मात्र, यावर्षी तर दलालांनी कळस गाठलाय.

Updated: May 18, 2012, 02:07 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबईत म्हाडाची स्वस्त घऱांसाठीची लॉटरी 31 मेला जाहीर होणार आहे. मात्र, दलालांनी आत्तापासूनच वेगवेगळे फंडे वापरायला सुरूवात केली आहे. गेल्यावर्षी बिल्डरांनी बनावट अर्ज दाखल केल्याचं उघड झालं होतं. मात्र, यावर्षी तर दलालांनी कळस गाठलाय. थेट लॉटरी काढतानाच दलाल सेटिंग करत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय.

 

जमीन कमी आणि लोकसंख्या जास्त...परिणामी मुंबईत अर्ध्यापेक्षा जास्त लोक झोपडपट्टीत राहतात.  दुसरीकडे एका फ्लॅटची किंमत एक कोटींच्या घरात असल्यानं तो विकत घेणं परवडणार तरी कसं ? अशावेळी अत्यल्प उत्पन्न गटातल्या नागरिकांना 9 लाखांमध्ये तर उच्च उत्पन्न गटातल्या नागरिकांना 57 लाखांमध्ये मिळणारा फ्लॅट मोठा दिलासाच ठरणारा आहे. मात्र म्हाडातले कर्मचारी आणि दलाल लॉटरीत घोळ कसा घालायचा ? याच्या तयारीत गुंतलेत. लॉटरीतून गॅरंटेड घर मिळवून देऊ, असा दावा दलाल करू लागलेत. त्या बदल्यात लाखोंचं कमिशन त्यांना कमवायचं आहे.

 

म्हाडा या वर्षी सुमारे 2600 फ्लॅट्सची लॉटरीद्वारे विक्री करणार आहे. यात उच्च, मध्यम, अल्प आणि अत्यल्प वर्गासाठी फ्लॅट्स आहेत. म्हाडाच्या उच्च उत्पन्न गटातल्या फ्लॅटची किंमत 49 ते 57 लाख आहे. मार्केट रेटमध्ये याची किंमत सुमारे पावणे दोन कोटी इतकी आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी म्हाडाने फ्लॅटची किंमत 25 ते 49 लाख इतकी आकारली आहे. तर मार्केट रेटनुसार त्याची किंमत 52 लाख ते एक कोटी इतकी आहे. अल्प गटातल्या फ्लॅट्सची म्हाडानं 15 ते 31 लाख इतकी किंमत ठरवली आहे. याचा मार्केट रेट 30 ते 70 लाख इतका आहे. तर पवई, सायन, कुर्ला, मालवणी,कांदिवली, बोरिवली आणि मागठाणे परिसरात अत्यल्प उत्पन्न गटासाठी कमी दरात घरं उपलब्ध करण्यात आलीयेत. यात सर्वाधिक सुमारे 1726 फ्लॅट्स ठाण्यातल्या मीरा रोड भागात आहेत. आणि याच भागावर मलिदा खाण्यासाठी दलालांच्या नजरा लागल्या आहेत.

 

गेल्यावर्षी म्हाडातल्या घोटाळेबाजांचा असाच प्रकार उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. शेकडो अर्जांवर एकच पत्ता, एकच बँक अकाऊंन्ट नंबर आणि एकच फोन नंबर आढळून आला होता. यानंतर बराच गदारोळ झाल्यानं म्हाडाने 17 दलालांसह 324 बनावट अर्ज दाखल करणा-यांविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला होता. आता यावर्षी म्हाडा दलालांना रोखण्यासाठी आणि भ्रष्ट अधिका-यांवर नजर ठेवण्यासाठी काय पावलं उचलतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.