इंटरनेटविना चालते रजनीकांतची वेबसाईट' !

www.allaboutrajni.com ही वेबसाईट इंटरनेटवर न चालता ‘रजनी पॉवर’वर चालते. या वेबसाईटवर रजनीकांतची अथपासून इतिपर्यंत इत्थ्यंभूत माहिती मिळते. मात्र ही साईट बघणं आपल्याला तेव्हाच शक्य होतं, जेव्हा आपण इंटरनेट कनेक्शन बंद करतो.

Updated: Jan 22, 2012, 11:50 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

सुपरस्टार रजनीकांत म्हणजे ‘लार्जेस्ट’ दॅन लाईफच ! अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी रजनीकांने सिनेमाच्या पडद्यावर करून दाखवल्या आहेत. पण, रजनीकांतच्या अशक्य करामती फक्त मोठ्या पडद्यावर घडतात असं नाही. तर काँप्युटरच्या पडद्यावरही त्याची अशक्य करामत पाहायला मिळेल. रजनीकांतच्या नावाची एक वेबसाईट असून या वेबसाईटचं वैशिष्ट्य म्हणजे ही वेबसाईट पाहण्यासाठी इंटरनेट कनेक्शन काढून टाकावं लागतं.

 

हे खोटं वाटत असलं तरी हे खरं आहे. www.allaboutrajni.com ही वेबसाईट इंटरनेटवर न चालता ‘रजनी पॉवर’वर चालते. या वेबसाईटवर रजनीकांतची अथपासून इतिपर्यंत इत्थ्यंभूत माहिती मिळते. रजनीकांतच्या सिनेमातले 'ऑफ द स्क्रीन सीन्स' आणि शूट या साईटवर पाहायला मिळतात. रजनीकांतच्या अशक्य करामतींवरील प्रसिद्ध जोक्सही या साईटवर वाचायला मिळतात.मात्र ही साईट बघणं आपल्याला तेव्हाच शक्य होतं, जेव्हा आपण इंटरनेट कनेक्शन बंद करतो.

 

“अशी आश्चर्यजनक वेबसाईट बनवणं आणि इंटरनेट कनेक्शन शिवाय ती चालवणं हे सर्व चमत्कार रजनीकांत यांना समर्पित केले आहेत. यामुळे रजनीकांत यांची सुपरस्टार ही प्रतिमा अजूनच खुलून येईल.” असं ही वेबसाईट बनवणाऱ्या ‘वेबचटनी’चे क्रिएटिव्ह डायरेक्टर गुरबक्ष सिंग यांनी सांगितलं. तसंच ही वेबसाईट एका कठीण अल्गोरिदमवर आधारित असून शेवटपासून सुरूवातीपर्यंत चालू असणाऱ्या दोन टर्मिनल्सच्या मधल्या डेटा पॅकेजच्या प्रचारावर नजर ठेवते. असंही गुरबक्ष सिंग यांनी सांगितलं.

 

 

या साईटवर सगळं रजनीमय आहे. सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत प्रत्यक आयकॉन, रंगसंगती ही रजनी स्टाईलमध्ये समोर येते. जर आपण आगाऊपणे मध्येच काँप्युटरला इंटरनेट जोडण्याचा प्रयत्न केला, तर, वेबसाईट संदेश येतो- “तुमच्याकडून ही अपेश्रा नव्हती, जर ही वेबसाईट पुढे पाहायची असेल, तर इंटरनेट कनेक्शन काढून टाका.”

 

 

रजनकांत यांच्या अशक्यप्राय करामतींबद्दल माहिती मिळवायला लोक या वेबसाईटवर येतात. ही वेबसाईट ऑफलाईन चालते, हे समजल्यापासून या वेबसाईटवर येणाऱ्यांची संख्या कित्येकपटींनी वाढली आहे. लोक या वेबसाईटची लिंक फेसबुकवर शेयर करतात. त्यामुळे या वेबसाईटची लोकप्रियता अजून वाढतच आहे. प्रचंड मेहनतीने ही वेबसाईट प्रत्यक्षात येणं शक्य झालं आहे. यासाठी एक विशिष्ट कोड शोधून काढण्यात आला, त्यामुळेच ही वेबसाईट ऑफलाईनही चालते. आणि जगभरात अशा पद्धतीने चालणारी ही पहिली आणि एकमेव वेबसाईट आहे... माईंड इट !