वसतिगृहातील प्रवेश ऑनलाईन!

महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीयांसह अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात प्रवेश ऑनलाईन होणार आहे, त्यासाठी पावले उचलण्यात येत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 3, 2012, 09:02 AM IST

www.24taas.com,मुंबई
महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीयांसह अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात प्रवेश ऑनलाईन होणार आहे, त्यासाठी पावले उचलण्यात येत आहे.
वसतीगृह प्रवेशासाठी होणारा गैरव्यवहार थांबविण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने प्रवेश गुणवत्ता आणि दारिद्रय़रेषाप्रमाणपत्राच्या आधारे ऑनलईन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे वसतिगृहात प्रवेश मिळणे सहज शक्य झाले आहे. त्यासाठी कोणाच्या नावाची शिफारस लागणार नाही.
ऑनलाईन प्रवेशामुळे राज्यातील आमदार, खासदार, मंत्री आणि राजकीय पक्षाच्या पदाधिकार्यांाच्या शिफारशींवरून होणाऱ्या प्रवेशांना कात्री बसणार आहे. विशेष म्हणजे वसतिगृह प्रवेशासाठीच्या आपल्या १५ टक्के कोट्याला तिलांजली देत सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांनी हा निर्णय घेतला आहे.
मागासवर्गीय आणि अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सरकारने राज्यात सुमारे २३८८ वसतिगृहे बांधली आहेत. यात १ हजार विद्यार्थी क्षमतेची ७ वसतिगृहे आहेत. विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि आर्थिक परिस्थितीच्या आधारे त्यात प्रवेश दिले जातात. या प्रवेशासाठी एकूण क्षमतेच्या १५ टक्के कोटा हा सामाजिक विभागाच्या मंत्र्यासाठी आरक्षित आहे.