www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुबंई विद्यापीठाच्या सोमवारी पार पडलेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत ११ नव्या अभ्यासक्रमांना मंजुरी देण्यात आली. टीवाय बीए, एमएच्या अभ्यासक्रमात बदव करण्यात आला असून एसवाय बीकॉममध्ये तीन नव्या विषयांची भर घालण्यात आली आहे.
नव्या अभ्यासक्रमांमध्ये प्रसार माध्यमांशी संबंधित स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून विविध पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचाही त्यांच्यात समावेश आहे. ११ नव्या अभ्याक्रमांमध्ये पाच अभ्यासक्रम फिल्म, टिव्ही आणि न्यू मीडिया प्रोडक्शन या विषयात पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. याचबरोबर मास्टर ऑफ एन्टरटेनमेंट मीडिया ऍण्ड ऍडव्हरटायझिग, टेलिव्हिजन स्टडी आणि फिल्म स्टडीजमध्ये मास्टर ऑफ आर्टस् हे प्रसारमाध्यमांशी संबंधित अभ्यासक्रम आहेत.
रिलीजन ऍण्ड सोसायटी, पीस ऍण्ड डायलॉग या विषयात पदविका अभ्यासक्रम, ऍडव्हान्स करिअर ओरिएंटेड कोर्स इन रूरल डेव्हलपमेंट, भक्ती साहित्यात पदविका अभ्यासक्रम, इंग्रजी भाषेतील प्रोफिशिअन्सी, सात वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांचे साहित्य आणि सिनेमॅटिक टेक्स्ट समजण्यासाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम, अशा अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे.
एसवायबीकॉममध्ये रिटेल मॅनेजमेंट, इन्शुरन्स आणि आंत्रप्रेनरशिप डेव्हलपमेंट हे तीन विषय वाढविण्यात आले आहेत. तर टीवाय बीएच्या २२ आणि एमएच्या १५ विषयांचा अभ्यासक्रम सुधारीत करण्यात आला आहे. बी.पी. एड, एम.पी.एड, एम.फीलचे तीन विषय, एफवाय बीएससी सायकॉलॉजी, टीवाय बीएससी केमिस्ट्री, इंजिनीअरींगच्या व्दितीय आणि तृतीय वर्षाचा अभ्यासक्रम आणि बीकॉमच्या तिन्ही वर्षांचे अभ्यासक्रम सुधारीत करण्यात आले आहेत. हे बदल येणारे वर्ष १० जूनपासून अमंलात आणण्यात येणार आहेत.