रुईया कॉलेजची अभिनयसंपन्न पंरपरा ज्या नाक्याने जवळून पाहिली तोच नाका आता बोलका होणार आहे. कारण याच कॉलेजच्या अमृतमहोत्सवा निमित्त 'नाका म्हणे' ही कलाकृती सादर होणार आहे आणि या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे ही कलाकृती हिंदी सिनेसृष्टीतले दिवंगत अभिनेता आणि रुईयाचे माजी विद्याथी शम्मी कपूर यांना ट्रिब्युट करण्यात येणार आहे.
अरुण सरनाईक, काशीनाथ घाणेकर, दिलीप प्रभावळकर, स्मिता तळवलकर, वंदना गुप्ते अशी रंगकर्मींची न संपणारी यादी. कलावंतांचा हा नाट्य संच रुईया कॉलेजच्या नाक्यावरच तयार झाला. याच नाक्याने रंगभूमीला अनेक रंगकर्मी दिलेत. त्यामुळेच रुईया कॉलेजच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने या कॉलेजमधले सगळे रंगकर्मी एकत्र येऊन सादर करत आहेत ‘नाका म्हणे’ ही कलाकृती. प्रत्येक कलावंताची चढण-घडण या नाक्याने पाहिली आहे. नाटकाच्या रंगलेल्या तालिमी, मित्रमैत्रिणींशी तासनतास रंगलेल्या गप्पा,एकांकीकेत नंबर पटकावला की त्याचं झालेलं सेलिब्रेशन तर दुसरीकडे अपयश आलं तरी नवी ऊर्मी दिलीय ती याच नाक्याने. आणि हेच सारं काही ‘नाका म्हणे’ या कलाकृतीत मांडण्याचा प्रयत्न याच कॉलेजचे माजी विद्यार्थी म्हणजे आत्ताचे सेलिब्रिटी करणार आहेत.
हा बोलका नाका साकारतोय तो संजय नार्वेकर. तसंच या नाटकात वंदना गुप्ते, विनय येडेकर, स्पृहा जोशी हे देखील महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. तर य़ा नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळलीय विनय आपटे यांनी. या निमित्ताने हे सारे सेलिब्रिटी पुन्हा एकदा फ्लॅशबॅकमध्ये गेलेत. तसंच या अमृतमहोत्वात क्रांती रेडकरचा डान्स जलवादेखिल आपल्याला अनुभवयला मिळणार आहे.
एकूणच पुन्हा तोच सळसळता उत्साह, आणि तोच जोश घेऊन हे रंगकर्मी या नाक्याला जिवंत करणार आहेत.