कैलास पुरी, www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
राज ठाकरे आणि अजित पवार यांच्यात सुरु असलेल्या वाग्युद्धामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विशेषतः दादांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अजितदादांनी गेल्या २ दिवसातले या परिसरातले सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केल्याने ‘अरे ला का रे’ म्हणणारे दादा अचानक एवढे शांत कसे बसले असा प्रश्न सगळ्यांना पडलाय.
कोल्हापूर, सोलापूर असो किंवा जालना या तीनही शहरांमध्ये झालेल्या जाहीर सभांमध्ये राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार घणाघाती टीका केली. यामुळेच अवघ्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी विरुद्ध मनसे असा सामना सुरु झाला. अजित पवारांनीही राज ठाकरेंवर प्रतिहल्ला चढवत या सामन्यात रंगत आणली. पण नगरमधील राज ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ला आणि जालन्यातील सभेनंतर दादा अचानक शांत झाले. जालन्यातील सभेच्या ज्या दिवशी जालन्यात सभा होती त्याच दिवशी अजित पवार यांचे पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक कार्यक्रम होते. दादा शहरात आल्यानंतर राज यांना जोरदार प्रत्युत्तर देतील अशा सगळ्यांचा अंदाज होता. पण दादांनी कार्यक्रमाला दांडी मारल्याने कार्यकर्त्यांची निराशा झाली. इतकंच नाही तर त्यानंतर दादांनी इतर कार्यक्रमही रद्द केले. अजित पवारांना टार्गेट केल्याशिवाय आपल्याला किंमत मिळणार नाही हे सगळ्यांना माहित असल्यानेच त्यांच्यावर टीका होत असल्याचं समर्थकांचं म्हणणं आहे.
राज ठाकरेंना डिवचल्यावर त्याचा फायदा राज यांनाच होईल अशा भूमिकेतून अजित दादा शांत बसले आहेत, असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. महाराष्ट्रात वजनदार समजल्या जाणा-या शरद पवारांवर टीका केल्यास त्याचा उलटा परिणाम होईल ही कल्पना असल्याने राज शरद पवारांवर संयमी वक्तव्य करत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.
जाणकारांचं मत काहीही असलं तरी कार्यकर्ते मात्र सध्या प्रचंड अस्वस्थ आहेत....दादांचा शांतपणा पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्यात....