`सचिनला ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधानच करा ना...`

ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा सन्मान केवळ ऑस्ट्रेलियन नागरिकांनाच दिला पाहिजे अशी मागणी माजी ऑसी टेस्ट प्लेअर मॅथ्यु हेडनने केली आहे...

Updated: Oct 19, 2012, 04:51 PM IST

www.24taas.com, कॅनबेरा
ऑस्ट्रेलियन पंतप्रधान ज्युलियन गिलार्ड यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया सन्मान देणार असल्याचं जाहीर केल्यानंतर.. नेहमीच रडीचा डाव खेळण्यात माहीर असलेल्या कांगारू प्लेअर्सच्या पोटात दुखायला लागलं. ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा सन्मान केवळ ऑस्ट्रेलियन नागरिकांनाच दिला पाहिजे अशी मागणी माजी ऑसी टेस्ट प्लेअर मॅथ्यु हेडनने केली आहे...
ऑस्ट्रेलियन पंतप्रधान ज्युलियन गिलार्ड यांनी सचिनला ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च अशा ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया सन्मानाने गौरवणार असल्याचं जाहीर केलं... आणि संपूर्ण क्रीडा विश्वात ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या या निर्णयाचं जोरदार स्वागत झालं. मात्र ऑस्ट्रेलियात पंतप्रधान गिलार्ड यांच्या या निर्णयाबाबात नाराजीचा सुर उमटलाय... जेव्हा जेव्हा भारतीय क्रिकेटर्सनी आपल्या खेळाने ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सच्या पोटात गोळा आणला तेव्हा तेव्हा त्यांनी नकारात्मक खेळालाच प्राधान्य देण्यात धन्यता मानली आहे... आताही माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मॅथ्यु हेडनने नाराजीचा सुर लगावताना सचिनच्या गौरवाबाबत नकारात्मक घंटा वाजवायला सुरूवात केली आहे...

ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा सन्मान केवळ ऑस्ट्रेलियन नागरिकालाच दिला गेला पाहिजे. जर सचिन तेंडुलकर ऑस्ट्रेलियात राहात असता, तर त्याला पंतप्रधानपद द्यायलाही माझी संमती असती. पण प्रत्यक्षात तो भारताचा नागरिक आहे. असं मत हेडनने व्यक्त केलंय. मॅथ्यु हेडन यालाही ऑस्ट्रेलियाच्या ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या सर्वोच्च सन्मानाने याआधी गौरवण्यात आलं आहे...कांगारूंना केवळ भारतीय क्रिकेटर्सचीच ऍलर्जी असल्याचं या विरोधातून दिसून आलंय.. याआधी वेस्ट इंडिजला दोन वर्ल्ड कप जिंकून देणा-या क्लाईव्ह लॉईड यांना 1985 मध्ये `ऑनररी ऑफीसर ऑफ द ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियानं` सन्मानित करण्यात आलं होतं.
तर सर गार्फिल्ड सोबर्सना 2003 मध्ये `ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया`नं गौरवण्यात आलं होतं. ब्रायन लारालाही 2009 मध्ये `ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया`नं सन्मानित केलं होतं त्यावेळी एकाही ऑसी क्रिकेटरनी या निर्णयाला विरोध केला नव्हता... क्रिकेटचे चॅम्पियन असणा-या कांगारूंची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सद्दी संपवण्यात भारतीय क्रिकेटर्सचा सिंहाचा वाटा होता... कांगारूंना त्यांच्याच भुमीत त्यांच्याच भाषेत पराभव चाखायला लावणारेही पहिले भारतीयच होते... त्यामुळे मनात बोचणारी ही सल ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सनी अशा प्रकारे व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे...